आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगासन स्पर्धा:योगविद्या म्हणजे यशाकडे जाणारा प्रमुख राजमार्ग; आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

संगमनेर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या लहान मुलांसमोर फार मोठा काळ आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच योगविद्येचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी जीवनात योग बंधनकारक असायला हवे. भविष्यात ही आपली संस्कृती व्हायला पाहिजे. उत्तम व्यक्तिमत्त्व, बलवान शरीर, उत्तम बुद्धिमत्ता या व्यक्तिगत गुणांसह सशक्त आणि समर्थ राष्ट्रासाठी हाच प्रमुख राजमार्ग आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला थोरात यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली, याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष व स्पर्धेचे संयोजक डॉ. संजय मालपाणी, थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, योगासन असोसिएशनचे सचिव रमाकांत पवार, कुलदीप कागडे यावेळी उपस्थित होते.आमदार थोरात म्हणाले, जिल्हास्तरीय स्पर्धांचे संगमनेरात आयोजन होणे ही मोठी गोष्ट आहे.

मध्यंतरी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्ह्यातील योगासनपटूंनी सुवर्ण यश मिळवले. यामागे खंबीरपणे उभे असलेले डॉ. संजय मालपाणी यांनी संपूर्ण जीवन शिक्षण क्षेत्रासाठी वाहून दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांचा निरोगी शिक्षणाचा विचार अत्यंत प्रभावी असल्याचे सांगत त्यासाठी योगविद्येची गरज ओळखून त्यांनी शिक्षणाला योगासनांची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात त्यांचा हा विचार जिल्ह्यात, राज्यात आणि देशातच नव्हेतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या स्पर्धेत जिल्ह्यातून १४४ स्पर्धक सहभागी झाले आहे. ठाण्याचे राजेश पवार हे प्रमुख पंच म्हणून काम पाहणार आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धक व प्रशिक्षकांचे स्वागत डॉ. संजय मालपाणी यांनी केले. जिल्हा असोसिएशनचे सचिव उमेश झोटींग यांनी सूत्रसंचालन तर उपाध्यक्ष कुलदीप कागडे यांनी आभार मानले. मुला-मुलींच्या तीन स्वतंत्र वयोगटात होणार्‍या या स्पर्धेत अजिंक्य ठरणारा संघ राज्यपातळीवरील स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...