आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:जिल्हा परिषदेचे गट जाहीर; श्रीगोंद्यात मात्र विधानसभा निवडणुकीचे पडघम

श्रीगोंदे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट, गण जाहीर झाले असले तरी श्रीगोंदे तालुक्यात मात्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. यात माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे आघाडीवर आहेत. त्यांचे कार्यकर्ते नागवडेंच्या घोषणेनंतर उत्साहित झाले आहेत. परंतु त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७ गटात कोणाचे बलाबल किती राहणार याची मात्र कोणीच चर्चा करत नाहीत. अर्थात नव्या गटात समाविष्ट गावे, वगळलेली गावे पाहता राष्ट्रवादीचे म्हणजे माजी आमदार राहुल जगताप यांचे ४ गटात प्राबल्य दिसते.

मांडवगण गटात माजी आमदार अरुण जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांच्या कुटुंबातील २ जणांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजय मिळवला. यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळाली, तर कोळगाव गटाचे राहुल जगताप यांनी आमदार होण्यापूर्वी प्रतिनिधित्व केले होते. बेलवंडी गट माजी जि. प.उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा बालेकिल्ला आहे. ते राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काम करत आहेत त्यांचे सुदैव एवढे की सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत त्यांनी राजेंद्र नागवडे विरुद्ध पॅनेल मधून निवडणूक हरल्यानंतर नागवडे यांनी बेलवंडी जिल्हा परिषद गटात शेलार यांच्या विरोधात लक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु या गटात नागवडे यांचे वांगदरी गाव नव्या रचनेत वगळल्याने शेलार सुरक्षित झाल्याचे म्हटले जात आहे.

नव्याने तयार झालेला पिंपळगाव पिसा गटात राहुल जगताप यांच्या पिंपळगाव पिसा गावाचा समावेश असल्याने किंबहुना गटातील मोठे गावच असल्याने राष्ट्रवादी चा आज तरी दबदबा आहे , एकरीत या चार गटांत जगताप यांचे आज तरी वर्चस्व दिसते. काष्टी गटातील गावांची संख्या तुलनेत कमी आहे, येथे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे वर्चस्व आहे तेथे कोणाला उमेदवारी मिळते यावर भाजपचा विजय अवलंबून राहील कारण काँग्रेसचे राजेंद्र नागवडे यांनी कारखाना निवडणुकीत पाचपुते गटाला मोठया प्रमाणावर खिंडार पाडले शिवाय अनिल पाचपुते यांना स्वीकृत संचालकपद बहाल केल्याने आणि काष्टी सोसायटीच्या निवडणुकीत भगवान पाचपुते यांच्या गटातील सत्ता परिवर्तन केल्याने काँग्रेसला येथेही अचानक विजय मिळण्याची अपेक्षा आहे तर लिंपणगाव गटात राजेंद्र नागवडे यांचे वर्चस्व असणारी व स्वतःचे वांगदरी गाव असल्याने काँग्रेसला येथे विजयाची खात्री आहे.

आढळगाव गटात भाजप आणि राष्ट्रवादी, काँग्रेस मध्ये अटीतटीचा सामना होऊ शकतो त्यात काही उमेदवार पक्ष बदलून उभे राहण्याची शक्यता आहे. भाजप मध्ये आमदार बबनराव पाचपुते यांचे एकमुखी नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांचे जाळे आहे पण प्रभाव पाडतील असे नेते नाहीत सर्व भार आमदार पाचपुते यांच्यावरच आहे. राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे किंवा दीपक नागवडे हे निवडणूक लढवतील. पिंपळगाव पिसा गटातून राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ.प्रणोती जगताप निवडणूक लढवणार, तर काष्टी गटात आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ.प्रतिभा पाचपुते की पुतण्या साजन पाचपुते यावर येथे कमळ उमलणार की पंजा याचे भवितव्य आहे.

काँग्रेस मध्ये भोस वगळता मोठा नेता नाही
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मात्र राहुल जगताप वगळता आमदार अरुण जगताप,अण्णासाहेब शेलार,राज्य साखर संघ संचालक घनश्याम शेलार आणि राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा अशी मंडळी असून अण्णासाहेब शेलार आणि बाळासाहेब नाहाटा यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होणार असून या जंगी प्रवेश सोहळा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...