आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान टळले:जिल्ह्यात कृषी पंपांची 1490 कोटींची थकबाकी; 23 कोटींची झाली वसुली

प्रशांत कळाशीकर | बुलडाणा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात एक लाख ५४ हजार २०८ कृषी पंपधारक आहेत. वीज वापरापोटी विजेची त्यांच्याकडील थकबाकी १४९०.२८ कोटी रुपये आहे. नैसर्गिक संकटासह विविध कारणांमुळे अनेक कृषीपंपधारकांनी वीज बिलाचा भरणा केला नाही. दुसरीकडे शासनाकडून सवलत योजना राबवूनही अनेकांनी उदासीनतेमुळे बिल न भरल्यामुळे महावितरणला आर्थिक फटका बसला आहे. थकबाकी पैकी जवळपास २३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. स्थगिती नंतर महावितरणने शेतकऱ्यांना किमान चालू वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. कृषीपंपांसंदर्भातील थकित बिल भरण्याची सक्ती मात्र केली नसल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी कापण्यास उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. चालू वीज बिल भरल्यास शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरू राहणार आहे. या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार असून, जिल्ह्यातील एक लाख ५४ हजार २०८ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या माध्यमातून रब्बीच्या पिकांचे संभाव्य नुकसान टळणार आहे. राज्यात औद्योगिक, कृषी, घरगुती आदी स्वरुपाची वीजजोडणी असणाऱ्या ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ७० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीच्या या मोठ्या रकमेमुळे महावितरण कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकी असलेल्या कृषीपंपधारकांची वीजजोडणी कापण्यास सुरुवात केली होती.

या कारवाईला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. मात्र, काही प्रमाणात ही कारवाई सुरूच होती. ही कारवाई थांबवण्याची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात येत होती. तसेच बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी पंपाची वीज कापण्यास स्थगिती दिली.

बुलडाणा जिल्ह्यात बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा स्थितीत त्यांना थकित असलेले वीज बिल भरणे अशक्य झाले आहे. सद्य:िस्थतीत रब्बी हंगाम सुरू असून,जिल्ह्यात यावर्षी तीन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या नोंदीनुसार आतापर्यंत सुमारे २० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पेरणी पूर्ण झाली आहे.

तर काही भागात पिकेही उगवली आहेत. बहुतांश भागात वीजपुरवठा अनेकदा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अडचण जाणवत आहे. अशातच महावितरणकडून वीज कापण्याच्या कारवाईमुळे रब्बीचे पीक हातचे जाण्याची शेतकऱ्यांना भीती होती. याच दरम्यान सरकारने या कारवाईला स्थगिती दिली असून, चालू बिल भरल्यास वीजजोडणी कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांना तूर्त तरी मोठा दिलासा मिळाला आहे.

तातडीने कारवाई नाही
मोठ्या प्रमाणात थकबाकी असतानाही कृषीपंपधारकांवर तातडीने थेट वीज तोडणीची कारवाई न करण्याची भूमिका जिल्ह्यात महावितरणने घेतली आहे. वीज तोडणीमुळे कृषीपंपधारकांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने किमान चालू वीज बिल भरावे, असे आवाहन केले जात आहे. थकबाकी वसूल करण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

बिल भरण्याचे आवाहन
सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडून बिलाची थकबाकी वसूल करण्याची मोहीम महावितरणकडून राबवली जात आहे. यामध्ये महावितरणचे जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी झाले आहेत. सुरळीत वीजपुरवठा आणि इतर कामांसाठी आर्थिक स्थिती बळकट असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांनी कमान चालू वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...