आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक:तामगाव पोलिसांच्या हद्दीत 16 तर शेगाव ग्रामीणच्या हद्दीत 19 अपघात ; वर्षभरात वरवट-शेगाव रस्त्यावर 35 अपघातात 19 जणांचा मृत्यू

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक वर्षांपासून संग्रामपूर ते शेगाव या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. शेकडो तक्रारी आणि आंदोलनानंतर एक वर्षांपूर्वी हा रस्ता शेगाव पासून जळगाव पर्यंत करण्यात आला. परंतु या रस्त्याच्या बाजूला असलेल्या कडा अजूनही भरल्या नसल्याने व वाहने घसरून सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. मागील एक वर्षात या रस्त्यावर ३५ अपघाताच्या घटना घडल्या असून त्यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ तर शेगाव ग्रामीणच्या हद्दीत १९ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघाताची आकडेवारी पाहता नव्याने झालेला रस्ता हा प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. वरवट बकाल ते शेगाव रस्त्यावर वरवट येथील मटण मार्केट समोर मागील सहा महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच खिरोडा गावाजवळ १४० गाव पाणी पुरवठ्याची पाइपलाइन गेल्याने तेथेही मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसापासून या दोन्ही ठिकाणी दररोज आठ ते दहा अपघाताच्या घटना घडत आहेत. आज ६ जून रोजी शेगाव वरून वरवट बकाल कडे सोनाळा येथील पती पत्नी दुचाकीने जात असतांना खिरोडा येथील मोठ्या खड्ड्यात उसळून खाली पडले. या अपघातात दोघांनाही जबर मार लागल्याने तेथिल पत्रकार सचिन कडूकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मागील एक वर्षांपासून संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील टुनकी, वरवट बकाल, वरवट खंडेराव, पातूर्डा, कुंदेगाव, जस्तगाव, शेगाव, पाडसुल, सगोडा, राजस्थान येथील एका ट्रक चालकासह इतर गावातील १९ जण या अपघातात ठार झाले आहेत. संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील नागरिक व्यवहार व रुग्णांवर उपचार करण्यासाठी शेगाव येथे जातात. या रस्त्याचे काम झाले तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याच्या कडा भरण्यात आल्या नाहीत. जवळपास एक फूट उंच रस्ता तयार झाल्याने भरधाव जाणारी वाहने समोरील किंवा मागाहून येणाऱ्या वाहनांना साइड देण्यासाठी रस्त्याच्या खाली उतरतात. त्यामुळे या वाहनाचे अपघात होत आहेत. शिवाय या रस्त्यावरून वाळूची वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अपघातात वाढ झाली आहे.

सुरक्षा सप्ताह राबवणे गरजेचे वरवट ते शेगाव या रस्त्यावर दररोज होणारे अपघात पाहता हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग झाला आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता रस्ता सुरक्षा सप्ताह राबवणे गरजेचे झाले आहे.

खड्ड्याचे काम करा, अन्यथा त्याच खड्ड्यात आंदोलन ^ खिरोडा गावाजवळ खूप मोठा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यांचे काम करावे, अन्यथा त्याच खड्ड्यात आंदोलन करण्यात येईल. -शांताराम दाणे, जिल्हा प्रमुख शिवसेना

दोन दिवसांत रस्त्याची डागडुजी करण्यात येईल ^खिरोडा येथे १४० गाव पाणी पुरवठा पाइपलाइन गेल्यामुळे व वाहनांमुळे येथे खड्डा पडला त्याचे काम लवकर करू -देवेंद्र अडचूडे, राष्ट्रीय महामार्ग अभियंता अकोला.

बातम्या आणखी आहेत...