आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षी चांगला पाऊस होऊनही आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाटबंधारे विभागाच्या मेहकर उपविभागांतर्गत १७ पैकी १६ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील जलसाठा निम्म्यावर आला आहे. यातील सहा प्रकल्पांमध्ये तर २५ टक्केच पाणी राहिल्याचे वास्तव आहे. तर शंभर टक्के भरलेल्या कोराडी मध्यम सिंचन प्रकल्पात ८९ टक्के साठा उपलब्ध आहे. तालुक्यात मागील वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यासोबतच अतिवृष्टीही झाली होती. त्यामुळे कोराडी व पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पांसह अन्य लघु पाटबंधारे प्रकल्पही पूर्णपणे भरले होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी या पाण्याचा मोठा आधार झाला होता. यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनेही मोठा दिलासा मिळाला होता. पावसाळा संपल्यानंतर आता आठ महिन्यांचा कालावधी होत असतानाही या प्रकल्पाची पातळी ५४४.९० असून, त्यामध्ये ८९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे परिसरातील सिंचन आणि पाणीपुरवठ्याला बहुतांशी आधार मिळणार आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर आता १६ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा राहिला आहे. पांगरखेड, पळशी, कळंबेश्वर, घनवटपूर, शिवणी जाट, पिंपळनेर, िटटवी, तांबोळा, गुंधा, देऊळगाव कुंडपाळ, अंभाेरा, िहरडव, केशवशिवणी, गारखेड, मांडवा, गंधारी या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी सहा प्रकल्पांमध्ये तर २५ टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा राहिला आहे. दुसरबीड, निमगाव वायाळ आणि देवखेड हे कोल्हापुरी बंधारे काही दिवसांपूर्वीच कोरडे पडले आहेत. बोराखेडी प्रकल्पात सद्य:स्थितीत ५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. काही दिवसांपूर्वी कोराडी आणि पेनटाकळी प्रकल्पातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील रब्बी पिकांना मोठा आधार झाला. दुसरीकडे मात्र लघु पाटबंधारे प्रकल्पांची पाणीपातळी खालावल्याने पाणीसमस्या बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत. |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.