आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराचा फटका:2311 पशुपालकांना अर्थसाहाय्य; 2248 जणांना मदतीची प्रतीक्षा

गिरीश पळसोदकर| खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा जिल्ह्यामध्ये लम्पी आजाराने ३ महिन्यात ५ हजार ५४ गाेवंश दगावले आहे. सरकारकडून दगावलेल्या गोवंश मालकांना देण्यात येणाऱ्या अर्थ सहाय्यासाठी जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातील ४ हजार ५५९ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी २ हजार ३११ गोवंश मालकांच्या खात्यात जि.प.च्या उपआयुक्त पशुसंवर्धन विभागातर्फे अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरीत गोवंश मालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एकूण २ लाख १८ हजार १८४ गाेवंशी ही संख्या आहे. यापैकी ५८ हजार २६६ गोवंश लम्पीच्या विळख्यात सापडले होते. औषधोपचारा नंतर ५० हजार ४८९ गोवंश बरे झालेले आहेत. मात्र ५ हजार ५४ गोवंशांना या आजाराने मृत्यूच्या दाढेत ओढले. यामध्ये २ हजार १४३ गायी, १ हजार ९३० बैल, ९८१ गाईच्या वासरांचा समावेश आहे. गायी मृत्यूमुखी पडल्याने त्या मालकांना दुधाच्या उत्पन्नापासून मुकावे लागलेले आहे. तर बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा सहारा घेत शेतीची कामे करावी लागली.

त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मशागतीसाठी पैसा मोजावा लागला आणि बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने झालेले नुकसान ते वेगळेच जिल्हयातील घाटावरील तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रकोप संपूर्णपणे थोपवण्यास पशुसंवर्धन विभागाला यश मिळालेले दिसून येत नाही आहे. तर अनेक शेतकऱ्यांसमोर बैल खरेदीसाठी पैसे कोठून आणावे असा प्रश्न पडला होता. सरकारकडून ज्या गोवंश मालकांचे गोवंश मृत्यूमुखी पडले त्यांना अर्थसाहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली.

या घोषणेमुळे त्या गोवंश मालकांना देण्यात येणारी आर्थिक मदत ही दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखी असल्याचे गोवंश मालक बोलू लागले आहे. लम्पीमुळे गाय मृत्यूमुखी पडल्यास ३० हजार रुपयांचापर्यंत, बैल मृत्यूमुखी पडल्यास २५ हजार रुपयापर्यंत तर वासरु मृत्यूमुखी पडल्यास १६ हजार रुपयापर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येत आहे.

जिल्ह्यात २ हजार ७०० पशूंवर उपचार
लम्पी आजाराने ग्रासलेले पशू तालुका निहाय बुलडाणा ३३९, चिखली १३०, देऊळगावराजा २९७, जळगाव जामोद २६१, खामगाव १९४, लोणार १९५, मलकापूर ८१, मेहकर २०३, मोताळा १५९, नांदुरा २३५, संग्रामपूर २९३, शेगाव १६१, सिंदखेडराजा १७५ असे एकूण २ हजार ७२३ पशूंवर उपचार सुरु आहेत. तर २४२ जनावरे मृत्यूच्या दारात उभे आहेत.
 
तालुकानिहाय दगावलेले पशू
बुलडाणा १५८, चिखली २५७, देऊळगावराजा ८५, जळगाव जामोद ६२०, खामगाव ८३०, लोणार ७४, मलकापूर ५३७, मेहकर १९०, मोताळा ५४३, नांदुरा ५९५, संग्रामपूर ६५२, शेगाव ४०२, सिंदखेडराजा ९१ असे एकूण ५ हजार ५४ गोवंश दगावले आहेत. यामध्ये गाय, बैल, वासरांचा समावेश आहे.

खामगाव तालुक्याला अधिक अर्थसहाय्य
जिल्ह्यातील गाेवंश मृतकांच्या मालकांना देण्यात आलेल्या अर्थसहाय्याची आकडेवारी पाहता खामगाव तालुक्यात सर्वाधिक ४८२ गोवंश मालकांना जि.प.चे उपआयुक्त (पशुसंवर्धन) कार्यालयातर्फे संबंधीत मालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. - चंदनसिंह राजपूत, गटविकास अधिकारी, पं.स.खामगाव.

बातम्या आणखी आहेत...