आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:279 ग्रा. पं. च्या मतदानासाठी 904 मतदान केंद्रांची स्थापना

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २७९ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीचा ऑफलाइन अर्ज भरण्याचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस होता. थेट सरपंच पद जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने ही रंगत चांगलीच वाढली आहे. त्यात खरीप हंगाम संपल्याने मतदानही चांगलेच होण्याची शक्यता आहे. रब्बीच्या पेरण्या सध्या सुरु आहेत. जिल्ह्यात ९०४ मतदान केंद्र मतदानासाठी निवडण्यात आले आहे. १ डिसेंबर पर्यंत सरंपचपदासाठी ५५२ तर १४९४ सदस्य पदांसाठी १४९८ अर्ज प्राप्त झाले होते. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली होती.

जिल्ह्यातील मेहकर आणि शेगाव वगळता सर्वच तालुक्यातील १ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र मेहकर व शेगाव तालुक्यात जागांच्या तुलनेत अर्ज कमी आल्याने तहसीलवर शुक्रवारी चांगलीच गर्दी दिसून आली. त्यातच २७९ जागांवर सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने आणि पन्नास टक्के आरक्षण महिलांना असल्याने बहुतांश गावपातळीवरील नेत्यांनी आपल्या सौभाग्यवतींना, काहींनी मातोश्रींना तर काहींनी बहीण व नात्यातील महिलांना उभे केले आहे.

ही निवडणूक मेहकर व लोणारात जास्त जागा असल्याने शिंदे गटासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण येथील खासदार व आमदार हे शिंदे गटात गेले आहेत व जिल्ह्यात सर्वाधिक जागा याच मतदारसंघात आहेत. त्यातच आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्याने ग्राम पंचायतवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. खरी लढत तर अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपासून सुरु होणार आहे. त्याला अजून तीन दिवस अवकाश आहे. मतदानाचा दिवस येईस्तोवर थंडीत रणधुमाळी चांगलीच पेटणार असून ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे.

तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
बुलडाणा १२, चिखली २८, देऊळगाव राजा १९,सिंदखेड राजा ३०, लोणार ३९, मेहकर ५०, खामगाव १६, शेगाव १०, मलकापूर ११, नांदुरा १३, जळगाव जामोद १९, मोताळा ११, संग्रामपूर २१ .

असे आहेत मतदान केंद्र
बुलडाणा ५५, चिखली ८७, देऊळगाव राजा ६०, सिंदखेड राजा ९४, लोणार १२९, मेहकर १५२, खामगाव ५०, शेगाव ३०, मलकापूर ३५, नांदुरा ४७, जळगाव जामोद ५७, मोताळा ३६, संग्रामपूर ७२

बातम्या आणखी आहेत...