आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा विभागांतर्गत येत असलेले चार राज्य मार्ग व दहा प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्ड्यांसह इतर कामांच्या दुरुस्तीसाठी चार कोटी रूपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात येणार आहे. यातील काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काहींची प्रक्रिया सुरू आहे. त्यात राज्यमार्गासाठी १३९.७७ लाख तर प्रमुख जिल्हा मार्गासाठी २५७.८५ लक्ष असा निधी दोन वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहे.
मागील दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक तेवढा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यातच अगोदर केलेल्या कामांचे बिलही प्रलंबित असल्याने बहुतांश कामे ठप्प पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बुलडाणा विभागांतर्गत येत असलेल्या बुलडाणा, सिंदखेडराजा, चिखली व मेहकर विधानसभा मतदार संघातील चाैदा रस्त्यांसाठी २०२२-२३ ते २०२३-२४ वर्षात करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एकूण ३९७.६२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बुलडाणा विभागांतर्गत चार विधानसभा मतदार संघातील ४०५.७० किमीचे राज्यमार्ग येतात. तर १ हजार ७७.४० किमीच्या प्रमुख जिल्हा मार्गाचा समावेश आहे. राज्य मार्गावरील एकूण चार रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १३९.७७ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर प्रमुख जिल्हा मार्गासाठी २५७.८५ लक्ष रूपयांचा निधी मंजूर आहे.
या मंजूर निधीतून चार राज्यमार्ग तर दहा प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजवणे, दोन्ही बाजूच्या कडा भरणे, रस्त्याच्या कडेला नाली काढणे आदी कामांचे स्वरूप आहे. या कामाची निविदा प्रकिया सुरू असून काहींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहे. परंतू अजूनही अनेक रस्ते डांबर व गिट्टीचे आहेत. याच रस्त्यावर सध्या जीवघेणे खड्डे पडले आहेत.
ऑफलाइन टेंडर प्रक्रिया नाही
रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर असलेल्या चौदा कामांची निविदा प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होत आहे. यातील सर्व कामावर दहा लाख रुपयांच्या वरती निधी मंजूर आहे. त्यामुळे या रस्ता दुरुस्तीच्या कामाची निविदा ही ऑफ़लाइन पद्धतीने होणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बुलडाणा कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याचा मानस
पुढील दोन वर्षांत बुलडाणा विभागातील चार राज्य मार्ग तर दहा प्रमुख जिल्हा मार्गांची दुरुस्ती करण्यात येणार आहेत. यासाठी ३९७.६२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काहींची सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात सदर रस्ते खड्डेमुक्त ठेवण्यात येतील.
रवींद्र काळवाघे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.