आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा १६ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या प्रकाशात ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वन्यजीव विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. ४१ मचान तयार करण्यात आले आहेत. या मचानावर बसून वन्यप्राणी पाहण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.
खामगाव रेंजमध्ये २० तर बुलडाणा रेंजमध्ये २१ मचानांचा समावेश आहे. पर्यटकांसाठी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाकडून ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली होती. शंभर टक्के बुकिंग झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी पाहण्यापासून पर्यटकांना वंचित राहावे लागले होते.
मात्र यंदा १६ मे रोजी मचानावर बसून वन्यप्राण्यांना पाहता येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली नाही. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार अभयारण्ये आहेत. खामगावपासून २५ किमी अंतरावर ज्ञानगंगा नदी शेजारी वसलेल्या २०५.२१ चौरस कि.मी.च्या क्षेत्राला ९ मे १९९७ रोजी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला.
या अभयारण्यात बिबट्या, वाघ, हरीण, काळवीट, रानमांजर, तडस, जंगली कुत्रे, लांडगा, रानडुकर, भेडकी, निलगाय, चोशिंगा, माकड, वटवाघुळ, अस्वल यासारखे वन्यजीव मुक्तपणे संचार करतात. अभयारण्यात सागर, धावडा, वीजामोहा, चारोळी, चिंच, आवळा, बेहडा, अंजन, बेल, सालाई या सारखी अनेक प्रजातीची वृक्ष आहेत. निरगुडी, बोराडी, आमटी, रायमोनिया, मारवेल, कुसळी, पवन्या, कुंदा सारख्या प्रजापती आहे. गुळवेल, पिंपळवेल, धामनवेल इत्यादी वेलींची उपलब्धता या अभयारण्यात आहे. स्थानिक तर काही स्थलांतरीत असे १५० प्रजातींचे पक्षी अभयारण्यात विहार करतात. धरण परिसर, लाखाचा झिरा, नळकुंड, निसर्ग परिचय केंद्र ही या अभयारण्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.