आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद ते नागपूर या राज्य महामार्गावर असलेल्या मेहकर ते डोणगाव या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर ४१२ खड्डे व अठरा गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे चालकांसाठी तारेवरची कसरत झाली आहे. परंतु या नादुरुस्त रस्त्याचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे ‘सांगा साहेब वाहन कसे चालवायचे’ असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. खराब रस्त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
औरंगाबाद ते नागपूर या महामार्गावर वाहनांची रात्रंदिवस कमालीची वर्दळ असते. हा महामार्ग डोणगावपासून मेहकरपर्यंत पंधरा किलोमीटरच्या अंतरात खड्डेमय झाला आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही नियमात न बसणारे गतिरोधक टाकण्यात आल्यामुळे रस्त्याला अजूनच खड्डेमय स्वरूप आले आहे. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनधारकांची वाहनांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. शिवाय दुचाकीधारकांना मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दररोज या पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये छोटे मोठे अपघात होत असल्यामुळे अनेकांचे जीव गेले असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. हा रस्ता कोणाकडे आहे, याची दुरुस्ती कोण करणार, याबाबतची माहिती सामान्य नागरिकाला उपलब्ध होत नसल्यामुळे अधिकारी देखील उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वारांना खड्डा दिसत नसल्यामुळे अनेक दुचाकीधारक खड्ड्यात पडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.
१५ किमी अंतर कापण्यास लागताे एक तासाचा अवधी
मी व्यवसायनिमित्त डोणगाववरून मेहकरला दररोज ये- जा करतो. या रस्त्यावर चारशेपेक्षा अधिक लहान मोठे खड्डे असून तब्बल अठरा गतिरोधक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे १५किलोमीटर अंतर कापण्यास एक तासाचा कालावधी लागत आहे. मेहकरला आलेला माणूस घरी डोणगावला सुखरूप जातो की नाही याची शाश्वती नाही. -गणेश गोळे, व्यावसायिक, डोणगाव
माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले होते आंदोलन
डोणगाव ते मेहकर बायपासपर्यंत मोठमोठे खड्डे आहेेत. या खड्ड्यांमुळे होणारे अपघात पाहता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी २५ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्या ठिकाणी निषेध व्यक्त करीत या रस्त्याच्या अधिकाऱ्यांचा मुर्दा पडो असे वाक्य लिहून निषेध नोंदवला होता हे विशेष.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.