आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे आज (११ डिसेंबर) रोजी लोकार्पण होत आहे. या महामार्गाचा ८७ किमी. भाग हा जिल्ह्यातील चार तालुक्यातून गेला असून, या चारही तालुक्यातील ५० गावांना ‘समृद्ध’ करत हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात अमुलाग्र बदल घडवून आणणार आहे. १२० मीटरच्या सहा मार्गिका असलेल्या या महामार्गावर जिल्ह्यात तीन इंटरचेंज आहेत.
दोन पॅकेजमध्ये झाले महामार्गाचे बांधकाम
जिल्ह्यात दोन पॅकेजमध्ये महामार्गाचे बांधकाम झाले. यातील सहाव्या पॅकेजमध्ये मेहकर तालुक्यातील बेलगाव ते पारडा या दरम्यान ३६.१०० किलोमीटर रस्ता बांधण्यात आला. या पॅकेजमध्ये २० गावातून हा रस्ता गेला आहे. सातव्या पॅकेजमध्ये ५१.१९० किलोमीटरचा रस्ता लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या तीन तालुक्यातील ३० गावांमधून गेला आहे. हा मार्ग बांडा, ता. लोणार, ते सावरगाव माळ, ता. सिंदखेड राजा यादरम्यान आहे.
दोन ठिकाणी उभारले टोलप्लाझा
जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी तब्बल तीन हजार कोटी रूपये खर्च झाले आहे. मेहकर, सिंदखेड राजा येथे टोलप्लाझा, पैनगंगा आणि खडकपूर्णा नदीवर दोन मोठे पूल, ३३ छोटे पूल, वाहनांसाठी १८ अंडरपास, १० ओव्हरपास, छोट्या वाहनांसाठी ३ अंडरपास, जनावरांसाठी ४० अंडरपास, ५३ चौकोनी बोगदे, ८७ बहुपयोगी बोगदे, प्राण्यांसाठी दोन ओव्हरपासच्या सुविधा या निमित्ताने जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत.
शेतकरी, व्यापाऱ्यांना होणार फायदा
जिल्ह्यातील चार तालुक्यात गेलेल्या या महामार्गालगत प्राधान्याने विविध धान्याची लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहु व नगदी पिकांमध्ये कापूस व सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. या महामार्गालगतच्या गावांमध्ये फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात संत्रा, डाळिंब, पेरु, द्राक्षांच्या बागा असल्याने या फळबागांनाही ‘समृध्दी’ महामार्गाचा फायदा होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.