आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंदखेडराजा तालुक्यातील हनवतखेड, वाघाळा, हिवरा गलडिंग, जनुना, शिवणी, नागझरी आणि शेंदुर्जन येथील शेतकरी रोहीमुळे त्रस्त झाले आहेत. या रोहींचा बंदोबस्त करण्याची मागणी करत या परिसरातील ५०० शेतकऱ्यांनी सह्यानिशी बुलडाणा उप वनसंरक्षक अक्षय गजभिये यांना निवेदन दिले आहे.
वन विभागाच्या जंगलाला लागूनच अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत. काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली, तर काही शेतकऱ्यांनी उसने पैसे घेऊन दुबार, तिबार पेरणी केली. परंतु वन्यप्राणी, नीलगायी, रानडुकरे, रोही, हरिण हे नेहमीच शेतामध्ये शिरून नासधूस करतात. आज रोजी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रोही कळपाने येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत असल्याने हे नुकसान परवडण्यासारखे नाही. रोही व वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाय करून पाहिले. परंतु सर्व उपाय व्यर्थ ठरत आहे. रात्रीला शेतकरी जिवाची पर्वा न करता पिके वाचवण्यासाठी जागरण करत आहे. हातचे पीक गेले, तर वर्षभराची भाकर जाणार आहे. त्यामुळे रोहींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सात गावातील शेतकऱ्यांनी उप वनसंरक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.
खोल नाल्या करू : रोही या प्राण्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी वन विभागाच्या जमिनीवरती दोन्ही बाजूने खोल नाल्या करणार आहोत. ज्यामुळे रोही जंगल सोडून जाणार नाही, असे उप वनसंरक्षकांनी शेतकऱ्यांना सांगितले. तर एकदा उप वनसंरक्षक पिकांच्या पाहणीसाठी शेतामध्ये जाणार आहेत, असे तुषार चव्हाण या शेतकऱ्याने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.