आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात १५ जुलैपासून १८ वर्षावरील लाभार्थ्यांना मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. ७५ दिवस ही मोफत बुस्टर डोसची मोहीम येत्या सात दिवसात संपणार आहे. त्यानंतर ही मोहिम बंद होणार आहे. त्यामुळे बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन साथ रोग विभागाने केले आहे.
यापूर्वी वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांनाच शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस देण्यात येत होता. शासनाने सशुल्क बुस्टर डोसची व्यवस्था केली. मात्र बुलडाणा जिल्ह्यात खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यास कुणीही पुढे आले नाही. परिणामी विविध भागांत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बुस्टर डोसला अल्प प्रतिसाद होता. म्हणून शासनाने शासकीय लसीकरण केंद्रांवरुन १८ वर्षांवरील सर्वांना बुस्टर डोसची व्यवस्था केली होती. आता केवळ पुढील ७ दिवसच ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यानंतर पुन्हा सशुल्क बुस्टर डोसला सुरूवात होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळते.
लसीकरणाचा लाभ दोन डोस झालेल्यांनी घ्यावा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात १५ जुलै ते ३० सप्टेंबर अशी मोफत बूस्टर डोसची लसीकरण मोहीम राबवली जात आहे. १८ वर्षावरील सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. ३० सप्टेंबरला या मोहिमेचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यामुळे पात्र दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनी डोस घ्यावा.
- डॉ. प्रशांत तांगडे पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी, बुलडाणा
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत बुस्टर डोस
जिल्हा लसीकरण अधिकारी यांच्या माहितीनुसार ३० सप्टेंबर नंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येत असलेली मोफत बूस्टर डोसची मोहिम बंद होणार आहे. मात्र त्यानंतरही ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, हेल्थ केअर वर्कर तसेच फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी मोफत बूस्टर डोसचे लसीकरण सुरू राहणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.