आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:‘लंपी’सदृश आजाराची 71 जनावरे आढळली ; पाच नमुने तपासणीसाठी पाठवणार : डॉ. अवताडे

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरांवरील लंपी स्कीन डिसीज सदृश आजाराने जिल्ह्यात पाय पसरवणे सुरू केले आहे. देऊळगावराजा, शेगावनंतर आता खामगाव तालुक्‍यातील काळेगाव, कुंबेफळ व ढोरपगाव या तीन गावांमध्ये एकूण ७१ गुरांना या रोगाची लक्षणे आढळून आल्याने पशू मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्षणे आढळलेल्या गुरांपैकी पाच गुरांचे रक्त नमुने घेण्यात आले असून, ते नमुने तपासणीसाठी अकोला विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेश अवताडे यांनी दिली.

या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी व आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून तालुक्यात पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. तालुक्यात पिंपळगावराजा, बोरजवळ, वर्णा, गणेशपूर, घारोड, अंत्रज, रामनगर, लाखनवाडा, शिर्ला नेमाने, बोथाकाजी, पळशी बु. व कोलोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात येणाऱ्या गावांत जाऊन संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी लसीकरण करत आहेत. तसेच शिबिरे घेऊन गुरांना लस टोचण्यात येत आहे. या लसीकरणाला २४ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाकडे १५ हजार लसींची मागणी नोंदवण्यात आली. त्यापैकी ५ हजार ४०० लसींचा पुरवठा करण्यात आला. त्या सर्व लसी गुरांना टोचल्या आहेत. लसींच्या पुरवठ्यानुसार अन्य गुरांचे लसीकरण होणार आहे.

देवी लस परिणामकारक
या रोगाची लागण साधारणत: बैल, गाय, वासरू व म्हशी यांना होते. या आजारावर कोणत्याही प्रकारची लस निघाली नसली तरी यावर बकऱ्यांना देण्यात येणारी देवीची लस परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आल्याने ही लस सध्या या आजारावर देण्यात येत आहे. पशू मालकांनी रक्त पिणाऱ्या किटकापासून आपल्या गुरांचे संरक्षण करावे.

बातम्या आणखी आहेत...