आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात रोहीच्या कळपाने हैदोस घातला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी होत असतानाही वन विभागाच्या वतीने कुठल्याच उपाययोजना करण्यात येत नाही. रोहीचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनही देण्यात आले होते. मात्र, त्याची संबंधित विभागाने दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ३० जुलै रोजी त्यांच्या निषेधार्थ शहरात मोर्चा काढला.
या मोर्चाचे आयोजन शेतकरी कृती समितीच्या वतीने केले होते. हा मोर्चा स्थानिक बसस्थानक चौकातून निघून संतोष चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. पुन्हा त्याच मार्गे परत येत बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप करण्यात आला. त्यानंतर रोही, रानडुक्कर, हरीण यासह अन्य वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळून त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन वन विभागाचे अधिकारी दुबे यांना देण्यात आले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे डॉ. रामप्रसाद शेळके, डॉ. सुनील कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मनोज कायंदे, विजय घोंगे, दादाराव खार्डे, प्रमोद घोंगे, उद्धव म्हस्के, गणेश बुरकूल, दिलीप खरात, अमोल काकड यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. तसेच यावर कुठल्याच उपाययोजना न केल्यास प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही दिला. या मोर्चात गिरोली खुर्द, गिरोली बु. असोला जहाँगीर, बामखेड, तुळजापूर, गोळेगाव, जवळखेड, उंबरखेड आदी गावातील शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांचे लागले बैठकीकडे लक्ष
वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासंदर्भात १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.