आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नाच्या एकदिवस आधी हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एका सोळा वर्षीय अल्पवयीन उपवर मुलीने घरुन निघून जात प्रियकरासोबत विषारी औषध प्राशन करून थेट पोलिस स्टेशन गाठले. यावेळी तिने आपले आई-वडील इच्छेविरुद्ध वय कमी असतानाही लग्न लावून देत असल्याचे पोलिसांना सांगितले. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. शहरातील एका सोळा वर्षीय मुलीचे शहरातीलच अठरा वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. हे प्रेमप्रकरण माहित पडल्याने मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी रत्नागिरी येथील एका मुलाशी तिचे लग्न ठरवले. लग्नाची तारीख ठरली. लग्न पत्रिकांचे वाटप करण्यात आले. ८ मार्च रोजी उपवर मुलीला हळद लागली. नातेवाइकांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मुलीच्या घरी आजच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. मात्र हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपवर मुलीने घर सोडून प्रियकराची भेट घेतली. त्यानंतर त्या दोघांनी विषारी औषध प्राशन करून थेट शहर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी लगेच दोघांनाही येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी पोलिसांनी मुलीच्या जबाबवरून, मुलीने आपले आई-वडील बळजबरीने कमी वय असतानाही लग्न लावून देत असल्याचे सांगितले. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी तिच्या आई-वडीलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.