आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गणेशोत्सवात घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

परतवाडा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या अचलपूर शहरातील झेंडा चौक नेहमीच जातीय तेढ निर्माण होऊन झालेल्या विवाहीत घटनांचा साक्षीदार ठरला आहे. या चौकात होणाऱ्या विवादांची नोंद पोलिस दप्तरी संवेदनशील असली, तरी मात्र गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम महिलेची अंत्ययात्रा जात असताना गणेश भक्तांनी आपले वाद्य, ढोल-ताशे बंद ठेवत या अंत्ययात्रेसाठी दिलेला रस्ता या झेंडा चौकाची नवीन ओळख होऊन तो हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक ठरला आहे.

अचलपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लिम कुटुंबीय एकत्रित राहून सणावारात सहभागी होतात. मात्र, काही लोकांमुळे हे शहर नेहमी संवेदनशील करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक सौहदार्याच्या एक नवा पायंडा घालत पुनश्च जातीयवादी कुनितीला थारा न देत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले.

मिरवणुकीदरम्यान बिलनपुरा, अचलपूर येथील झेंडा चौक हा नेहमीच गर्दीचा भाग असतो. त्याच दरम्यान अचलपूर शहरातील बियाबानी निवासी शेख रफिक किराणा यांच्या परिवारातील एका महिलेचे निधन झाल्याने त्यांची अंतिम यात्रा या झेंडा चौकातून जात असताना सर्व गणेशोत्सव मंडळाने आपले ढोल-ताशे, वाद्य व लेझीम बंद ठेवली. खिडकी गेटपर्यंत ही अंत्ययात्रा गेल्यानंतर गणपती विसर्जनाची मिरवणूक पुन्हा प्रारंभ झाली. अचलपूर शहर संवेदनशील नव्हे, तर सर्वधर्म समभावाचा विचार देणारे शहर असल्याचा संदेश या मिरवणुकीच्या माध्यमातून दोन्ही समाजबांधवांनी दिला. या वेळी अचलपूरचे ठाणेदार माधव गरुड, शांतता समिती सदस्य, हेल्पलाईन सदस्य, गणपती मंडळ सदस्य व विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.

अचलपुरातील एकतेचा संदेश प्रेरणादायी
अचलपूर शहरातील गणेश मंडळांच्या भक्तांनी मुस्लिम महिलेच्या अंत्य यात्रेदरम्यान मिरवणुकीतून रस्ता मोकळा करून देत दिलेला संदेश प्रशंसनीय असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे. हा हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्रित येत सौहदार्याचा संदेश दिला आहे.
माधव गरुड, ठाणेदार, अचलपूर

बातम्या आणखी आहेत...