आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर येथून शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला रविवारी सकाळी मेहकरनजीक शिवणी पिसा गावाजवळ पुलावर भरधाव कार डांबराच्या पॅचवरून उसळून सुमारे ३०० फूट दूर जाऊन उलटली. हा अपघात एवढा भीषण होती की गाडीचे छप्पर उडून कारमधील १३ प्रवासी रस्त्यावर पडले. या अपघातात ६ जण जागीच ठार झाले, तर चालकासह ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन बहिणी हौसाबाई बर्वे व प्रमिला बोरुडे यांच्यासह त्या दोघींच्या सुना आणि एक मुलगा आणि एका नातीचा समावेश आहे.
संभाजीनगर येथील बोरुडे व बर्वे परिवारातील एकूण १३ जण आज शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळी इर्टिगा कारने (क्रमांक : एमएच २० एफयू ८९६२) जात होते. आठ वाजेच्या सुमारास मेहकरजवळ शिवणी पिसा गावानजीक असलेल्या पुलावर ही कार उसळली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने नागपूरच्या दिशेने जाणारी ही कार दोनशे ते तीनशे फूट पलटी मारत जाऊन तिचे तोंड मुंबईच्या दिशेने झाले. अपघातानंतर कारमधील सर्वजण रस्त्यावर पडले. अपघातात कारचे छप्पर उडून चक्काचूर झाला. या दरम्यान नागपूर व मुंबई महामार्गावरील सर्वच वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात ६ जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये हौसाबाई भरत बर्वे ( ६० आजी), श्रद्धा सुरेश बर्वे ( २८ सून), जानव्ही सुरेश बर्वे (११ नात) आणि हौसाबाई यांची बहिण प्रमिला राजेंद्र बोरुडे (५८), किरण राजेंद्र बोरुडे (३५), भाग्यश्री किरण बोरुडे (२८) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये नम्रता रवींद्र बर्वे (३२), रुद्र रवींद्र बर्वे (१२), यश रवींद्र बर्वे (१०), सौम्या रवींद्र बर्वे ( ४), जतीन सुरेश बर्वे ( ४), वैष्णवी सुनील गायकवाड (१९), चालक सुरेश भरत बर्वे ( ३५) यांचा समावेश आहे. अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील क्विक रिस्पॉन्स पथक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तत्काळ मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यासह इतर दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले, अशी माहिती माहिती वैद्यकीय अधिकारी श्याम ठोंबरे यांनी दिली.
मदतीसाठी अनेकजण सरसावले : अपघातानंतर घटनास्थळी शिवणी पिसा येथील ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यामध्ये सरपंच समाधान पिसे, विशाल पिसे, शिवशंकर पिसे, संदीप पिसे, खुशाल वाघ यांच्यासह मेहकर शहरातीलही अनेकांचा समावेश होता.
अधिकारी - पदाधिकाऱ्यांनी घेतली धाव
अपघाताचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, सहायक पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी मेहकर ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठीया, आमदार संजय रायमुलकर यांचे बंधू प्रमोद रायमुलकर, विलास आखाडे, नंदकिशोर चौधरी, विनोद भिसे, गजानन सौभागे, मारोती जुनघरे, सागर कडभणे, रमेश गायकवाड, अजय पिंपरकर, नायब तहसीलदार आणि कर्मचारी, महावितरणचे नाईक आणि कर्मचारी, रामेश्वर भिसे, डॉ. योगिता शेजोळ, डॉ. आशिष नरवाडे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
मेहकरनजीक भीषण अपघात; ७ जण गंभीर जखमी
मदत मिळण्यास पाऊण तास उशीर
धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर जवळपास पाऊण तास अपघातग्रस्तांना यंत्रणेकडून मदत मिळाली नसल्याची माहिती स्थानिकांसह प्रत्यक्षदर्शींनी दिली. मेहकर टोल प्लाझा येथून केवळ १० किलोमीटरवर झालेल्या या अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळाली नाही.गावकऱ्यांनी तत्काळ मदत कार्यास सुरुवात केली. अशी माहिती मदतकार्यात सहभागी झालेले सरपंच समाधान पिसे, संदीप पिसे व खुशालराव वाघ यांनी ‘ दिव्य मराठी’ ला दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.