आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी:आदिशक्ती मुक्ताई पालखी आज बुलडाण्यात ; महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, कर्नाटकमधील वारकरी सहभागी

बुलडाणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिशक्ती मुक्ताई पालखीने जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी (समाधीस्थळ) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. ही पालखी सातोड, भालेगाव, मलकापूर, शेलापूर, टाकरखेड, मोताळा आदी ठिकाणी मुक्काम करुन सातव्या मुक्कामासाठी ९ जून रोजी शहरातील जुनागाव हनुमान मंदिर बुलडाणा येथे सायंकाळपर्यंत दाखल होणार आहे. श्री संत मुक्ताबाई पायी पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांसमवेत टाळ, मृदंगांच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम, मुक्ताबाईचा अखंड नाम जप करत शहरात दाखल होणार आहे. पायी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता वसंतराव जोशी यांनी भोजनाचे नियोजन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास नगर पालिका, सराफा बाजार, सहकारी बँक, चैतन्यवाडीमार्गे दहा वाजता रामनगर येथे उमाकांत कुळकर्णी यांच्याकडे भोजनासाठी थांबणार असून दुपारी एकच्या सुमारास पुढे प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्यात मध्यप्रदेश, कर्नाटकसह खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातील वारकरी सहभागी झाले आहेत. भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी केले आहे.या दिंडीतील अद्ययावत माहिती व फोटो मिळणार सोशल मीडियावर उपलब्ध होणार आहेत.

संत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यातील सेवेकरी पालखीचे प्रमुख म्हणून हभप रवींद्र महाराज हरणे तर विजय महाराज खवले, लखन महाराज, श्रीकांत महाराज, परमेश्वर महाराज हे नियमित सकाळ,दुपार, सायंकाळ काकडा, भजन, प्रवचन, कीर्तन, भारूड रुपी सेवा देत आहेत. तर पुजारी म्हणून सुधाकर पाटील मनूर, मुरलीधर संबारे बेलाड हे काम बघत आहेत. तर पालखीचा रथ ओढण्याकरीता मध्य प्रदेशातील नाचणखेडा येथील शेतकरी प्रकाश पाटील यांची बैलजोडी असून संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील हे वेळोवेळी पालखीतील वारकऱ्यांची विचारपूस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...