आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचे प्रमाण वाढले:कोथळी ते धामणगाव देशमुख रस्त्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; रस्त्यावरून वाहने चालवण्यास वाहनधारकांचा नकार

मोताळाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून कोथळी ते धामणगाव देशमुख या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे या मार्गाची चाळणी झाली आहे खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात लहान मोठे अपघात नेहमी घडत आहेत. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

कोथळी ते धामणगाव देशमुख हा अतिशय वर्दळ असलेला मार्ग आहे. या मार्गावरून निमखेड, पिंपळगाव नाथ, रामगाव, गिल्लोरी यासह इतर ग्रामीण भागातील अनेक गावातील वाहन धारकांची या मार्गावरून रहदारी सुरू असते. परंतु मागील काही दिवसांपासून या मार्गाची खस्ता हालत झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

त्यामुळे वाहन धारकांना या मार्गावर वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. या मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजणे कठीण झाले आहे. या मार्गावर खड्डे चुकवण्याच्या नादात लहान-मोठे अपघात हे नेहमी घडत आहेत. शिवाय या मार्गावर खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनावरचा ताबा सुटून वाहन दुसऱ्या वाहनांवर धडकण्याचे प्रकार देखील घडत आहेत.

त्यामुळे वाहनधारकांमध्ये शाब्दिक वाद होतांना दिसून येत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील काही फेऱ्या कमी केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या एस टी बसेसचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. अशातच रस्त्याची दुरावस्था झाल्याने खाजगी वाहनधारक आपली वाहने या मार्गावर चालविण्यास नकार घंटा देत आहेत.

त्यामुळे या भागातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. धामणगाव देशमुख येथून जवळच खामगाव तालुक्याची सीमा आहे. परंतु नागरिकांना खामगाव दूर पडत असून मोताळा हे जवळ असून सोयीचे आहे. त्यामुळे या भागातील नागरीक शेतीउपयोगी साहित्यासह इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी मोताळा तालुक्याला पसंती देताना दिसून येतात. परंतु या मार्गाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

या मार्गावरील खड्डे न बुजवल्यास या मार्गावर मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पावसाळ्यात पावसाचे पाणी पडल्यावर रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरून जातात. त्यामुळे वाहधारकांना हे खड्डे दिसत नाहीत. रस्त्यात कुठे खड्डा आहे, कुठे नाही अशावेळी अपघात घडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे विभागाने लक्ष देऊन या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.