आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:जिल्ह्यामधील 45 हजार 431 शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. तर काही ठिकाणी पूर परिस्थितीही निर्माण झाली होती. या नुकसानीची भरपाई शासनाने वाढीव दराने देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील ४५ हजार ४३१ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. दोन हेक्टर व तीन हेक्टर मर्यादेपर्यंतचे तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांचा या मदतीत समावेश आहे. शासनाने १५ डिसेंबर रोजी हा निर्णय घेतला असला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली नाही. येत्या काही दिवसांत ती पोहोचण्याची शक्यता आहे.

शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्याचा शासन निर्णय काढला असून यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टर क्षेत्राला तेरा हजार ६०० रुपयांपर्यंत प्रति हेक्टर दर मंजूर केला आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टरची मर्यादा ठरवली असून प्रति हेक्टर २७ हजार रुपये मंजूर केले आहेत. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टरची मर्यादा ठेवली असून प्रति हेक्टर ३६ हजार रुपये अशी मदत मंजूर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त व विभागीय आयुक्त अमरावती यांनी शेत पीक व शेतजमिनीच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला मंजुरी देत शासनाने १५ डिसेंबर रोजी निर्णय काढला आहे. या नुकसानीची मदत वाटप केल्यानंतर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मदतीचा तपशील जाहीर करण्याचेही शासनाचे आदेश आहेत.

जिल्ह्याला शासनाकडून मिळालेला निधी
बुलडाणा जिल्ह्यात ४५ हजार ४३१ शेतकऱ्यांचे ३४९९३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या बाधित क्षेत्राला दोन हेक्टर पर्यंतची मदत २५२१.०२ लाख अशी दोन वेगवेगळया निधी खाली देण्यात आली. २७८२.८५ हेक्टर बाधित क्षेत्रावरील दोन ते तीन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे मदत ३७३.०३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. अशा एकूण ३७ हजार ७३६ हेक्टर क्षेत्राला २८९४.०५ लाख रुपयांचा निधी एकूण निधी ५४१५.०७ लाखांचा एकूण नुकसानी करता मंजूर करण्यात आला आहे.

असे आहेत दर
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी सहा हजार ८०० रुपये प्रति हेक्टर मदत दोन हेक्टरसाठी प्रचलित दर होते. वाढीव दर १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टर मर्यादित होता. वाढीव दर २७ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८००० रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होता. वाढीव दर ३६ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे.

सर्वाधिक नुकसान मेहकर तालुक्यात
सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान मेहकर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. सिंदखेड राजात, मोताळा, बुलडाणा आदी भागातही अतिवृष्टीचा फटका बसला होता.

बातम्या आणखी आहेत...