आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा तुटवडा:पाऊस सरासरीपेक्षा कमी असला तरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पेरण्यांना सुरुवात; गेल्या वर्षी 5 तालुक्यात 100 मिमी पावसाची होती नोंद

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायाला पेरणीसाठी किमान १०० मिमी पावसाची आवश्यकता असल्याच्या मार्गदर्शक सूचना नेहमीच कृषी विभागाकडून दिल्या जातात. जिल्ह्यातील तीन तालुक्यात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने आता जमिनीतील ओल पाहून पेरणी करण्यास सुकर वाट मिळाली आहे. तर सध्या काळे ढगही आकाशात दिसून येत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मात्र यावेळी पाऊस कमी आहे. मागील वर्षी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेले 5 तालुके होते. यंदा डोंगरी भाग असलेल्या बुलडाणा जिल्ह्यावरही पावसाची मेहरबानी नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार सरासरी 761.6 मिमी इतके दर्शवण्यात आले आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. गतवर्षी २२ जूनपर्यंतचा पाऊस सरासरी 103.6 मिमी इतका होता. यंदा 71.9 मिमी इतका पाऊस पडला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पडलेला पाऊस 9.2 मिमी इतका आहे. ज्या चिखली तालुक्यात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे त्या तालुक्यातील जवळपास 88 हजार 644 हेक्टरवरील पेरणी आता होण्यात जमा आहे. देऊळगाव राजा तालुक्यातही 36 हजार 481 हेक्टरवर पेरणी होत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातही 63 हजार 721 हेक्टरवर पेरणी होत आहे. मेहकर तालुक्यातही 83 हजार 819 हेक्टरवर पेरणी होत आहे.

उर्वरीत तालुक्यात तर सिंचनावर पीक पेरणी करण्याची तयारी सुरु आहे. तर काहींनी पेरणी देखील केली आहे. यंदा सर्वाधिक पेरणी सोयाबीनची तीन लाखापेक्षा अधिक हेक्टरवर करण्यात येणार आहे. दुसरे नगदी पीक म्हणून कापसाची लागवड होणार आहे. कडधान्याची लागवडही 2 लाख 55 हजार 524 हेक्टर क्षेत्रावर होत आहे. तृण धान्याची लागवड 32 हजार हेक्टर क्षेत्रावर होत आहे.

सकाळी ८ वाजेपर्यंत पडलेला पाऊस

बुलडाणा 18.8, चिखली 20.4, देऊळगाव राजा 27.8, सिंदखेड राजा 14.8, लोणार 3.7, मेहकर 13.9, खामगाव 4.0, शेगाव 0.6, मलकापूर 0.2, नांदुरा 409, मोताळा 8.1, संग्रामपूर 1.2, जळगाव जामोद 1.2

जिल्ह्यात आजपर्यंत झालेला पाऊस

बुलडाणा 88.8, चिखली 123.5, देऊळगाव राजा 104.1, सिंदखेड राजा 103.0, लोणार 80.9, मेहकर 137.4, खामगाव 63.9, शेगाव 59, मलकापूर 32, नांदुरा 35.5, मोताळा 44.9, संग्रामपूर 35.9, जळगाव जामोद 25.9 मिमी. पाऊस पडला.

पेरणीला सुरुवात केली

आमच्या भागात पेरणीयोग्य पाऊस पडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने पेरणी ही उशिरा करावी लागली. आता जमिनीत ओल असल्याने बियाण्यांना कोम फुटून यंदा चांगली पीके येण्याची अपेक्षा आहे. जगन्नाथ मदने, देऊळगाव माळी