आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानाचा गणपती:पर्यावरणपूरक मूर्तीची दरवर्षी करतात स्थापना ; सावजी गणेश मंडळाला तीनशे वर्षांची परंपरा

देऊळगावराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री बालाजी फरस परिसरात सावजी गणेश मंडळाच्या वतीने गणेशाची स्थापना मागील तीनशे वर्षांपासून केली जाते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेची परंपरा या मंडळाने आजतागायत जपली आहे. देऊळगावराजातील मानाचा गणपती म्हणून सावजी गणेश मंडळाची ओळख आहे. या मंडळाकडून दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांना भाविकांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.

श्री सावजी गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती बनवण्याचा मुहूर्त गोकुळाष्टमीला केला जातो. सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने ठरलेल्या कुंभाराकडून माती घेतली जाते. त्यानंतर सुरेश विष्णू सावजी व त्यांचे सहकारी मूर्ती तयार करतात व त्या मूर्तीची स्थापना केली जाते. ही परंपरा मागील तीनशे वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. श्री बालाजी महाराजांची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, अशी प्रार्थना या गणरायाला भक्तांकडून केली जाते. दर्शनासाठी येथे येणारे भाविक भक्त पाच नारळांचा फुलोरा गणेशाच्या चरणी अर्पण करतात. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी या गणरायाचे विसर्जन केले जाते. यावेळी एक क्विंटल २५ किलो खिचडीचा प्रसाद तयार करून भाविकांना महाप्रसादाच्या स्वरूपात वाटण्याची परंपरा आहे. शहरासह परिसरातील हजारो भाविकांची दर्शनासाठी येथे रीघ लागते. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

देऊळगावराजा शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या श्री सावजी गणेश मंडळाचे अध्यक्ष रमेश सावजी, तर उपाध्यक्ष अॅड. अर्पित मिनासे हे आहेत. गणेश मंडळाच्या इतर कार्यकारिणीमध्ये गिरीश पापडे, मोरेश्वर मिनासे, प्रमोद सावजी, डॉ. संतोष पापडे, संदीप मिनासे, डॉ. रवींद्र व्यवहारे, नीलेश मिनासे, राहुल महाजन आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...