आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार व्यक्त केला:शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल तुपकरांचा सत्कार

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी लढा उभारला असून राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. दरम्यान, दिल्ली दरबारी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडून तुपकर गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी त्यांचे रॅली काढून जंगी स्वागत करत सत्कार केला. यावेळी रविकांत तुपकरांनी शहीद जवान स्व. संजयसिंह राजपूत यांच्या स्मृतीस्थळी जावून अभिवादन केले.

सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा निघाला. त्यानंतर अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनासाठी त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत धडक दिली. अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी बुलढाणा, वाशीम जिल्ह्यासाठी १५७ कोटींची मदत जाहीर केली. बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर ज्यांना अजून पीक विमा मिळाला नाही किंवा कमी मिळाला त्यांच्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणार नाही असा निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडले आहे.

कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द झाली, शेतमजुरांना विमा सुरक्षा देण्यासाठी सरकार योजना आणणार आहे, जंगली जनावरांपासून शेती पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाउंड करण्यासाठीचीही योजना सरकार आणणार आहे. यासह राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. साडेतीन हजारांचा सोयाबीनचा भाव सध्या साडेपाच हजारापर्यंत पोहोचला आहे व कापसाचा ६ हजाराचा भाव ७ ते ८ हजारावर पोहोचला आहे. या करता तुपकरांनी दिल्ली वारी करुन सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या व्यथा मांडल्या.

या दौऱ्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खा. डॉ. अमोल कोल्हे आदींच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात परतताच त्यांचे मलकापुरात स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात थोडेफार का होईना काही पाडू शकलो याचे समाधान आहे. हा लढा अजून संपला नाही, केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरुच ठेऊ, असे यावेळी सत्काराला उत्तर देताना तुपकरांनी सांगितले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, मारोती मेढे, प्रदीप शेळके, सय्यद वसीम, नीलेश नारखेडे,सचिन शिंगोटे, दत्ता पाटील, उमेश राजपूत, अजय बावसकर, विवेक पाटील, शिवा हिवाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...