आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:मेहकर येथील 68 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता; पाणी टंचाईबाबत मात्र प्रशासकीय, राजकीय उदासीनता

मेहकर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोराडी प्रकल्पात मुबलक जलसाठा, तरी मेहकरला बारा दिवसाआड पाणी या मथळ्याखाली दैनिक दिव्य मराठीच्या २२ एप्रिल रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. दरम्यान, दिव्य मराठीच्या पाठपुराव्याची संबधित विभागाने व राजकीय नेत्यांनी दखल घेतल्यामुळे ६८ कोटी २१ लक्ष ६१ हजार रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. सदर मंजुरी ही ७ जून रोजी देण्यात आली असल्याने आगामी काळात शहरवासीयांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.

सुयोग्य नियोजन केले तर भर उन्हाळ्यात देखील मेहकर शहराला महिन्याकाठी चार वेळा पाणी पुरवठा होऊ शकतो. मात्र, न. प. पाणीपुरवठा विभागात नियोजन नसल्याने याचा फटका शहरवासीयांना बसत आहे. कोराडी प्रकल्पात सध्या स्थितीत मुबलक जलसाठा असताना देखील बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. असे विदारक चित्र असताना देखील ६२ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना कागदावरच अडकून पडली होती. शहराच्या पाणी टंचाईला प्रशासकीय व राजकीय उदासीनता दिसून येत असल्याने दैनिक दिव्य मराठीने याबाबत सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत ६२ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मागील चार वर्षापुर्वी मंजुर करण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने तांत्रिक बाब पूर्ण न केल्यामुळे ही योजना रखडली. सध्या शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा मिळत आहे.

कोराडी प्रकल्प ते फिल्टर प्लांटच्या टाकीवर एका तासाला दोन लाख लिटर पाणी साठवणूक होते. तर काही अडथळे न आल्यास २४ तासांमध्ये ४० लाख लिटर पाणी धरणावरून शहरात दाखल होऊ शकते. या पाण्याचे नियोजन नगर परिषदेने जुन्या व नव्या वस्ती मध्ये १३० अंतर्गत जलवाहिनीच्या माध्यमातून केल्यास एका कुटुंबाला आठ दिवसाआड तीन हजार लिटर पाणी देऊ शकते.

मात्र तेच पाणी नियोजन नसल्यामुळे बारा दिवसाआड मिळत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मेहकर शहरासाठी कोट्यावधी रुपयांची योजना आखली आहे. परंतु सदर पाणी पुरवठा योजने करीता न.प.ने नेमलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांना दोन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप त्यांचे काम पूर्ण झाले नाही. या कामासाठी चार वर्षांचा कालावधी लागून सुध्दा ते पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे आतातरी संबधित विभागाने याचे योग्य नियोजन करून ती योजना पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे.

चार वर्षात ६ कोटींची वाढ
मेहकर शहराला मागील चार वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची एकूण रक्कम ही ६२ कोटी होती. मात्र दरम्यानच्या काळात सदर योजना पूर्णत्वास न गेल्याने व इतर खर्चात वाढ झाल्याने आता याच योजनेमध्ये सहा कोटी रुपयांची वाढ झाली असून त्याला नुकतीच तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...