आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलचरांना धोका:सरकारी तलावात जलपर्णीचे साम्राज्य ; तलावामधील पाणी वाढल्यानंतर वनस्पती फोफावली

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे वैभव करण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या तलावाला जलपर्णीने वेढा घातला आहे. जलचर प्राण्यांसाठी हे धोकादायक असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यातच इतर वनस्पतींचीही वाढ होत आहे. मात्र कृषी पर्यटन म्हणून ही जागा अद्याप पूर्णपणे विकसित करण्यात आलेली नाही.

क्षय आरोग्य धाम धाड रोड समोर कृषी विभागाच्या रोपवाटिकेला लागून बऱ्याच वर्षांपासून सरकारी तलाव अस्तित्वात आहे. या तलावावर पूर्वी मोठ्या प्रमाणात कपडे धुण्याचे काम केले जायचे. पाणी टंचाईत हा तलाव उपयोगाचा ठरत होता. कालांतराने या तलावात प्रदूषण वाढत गेले. गायी, म्हशी यथेच्छ डुंबायला लागल्या. लोकांचे येणे कमी झाले अन् तलावात धामण वाढू लागल्या. मध्यंतरी मत्स्यपालनासाठी हा तलाव देण्यात आला होता. परंतु पाणी प्रदूषित झाल्याने माशांचाही मृत्यू झाला होता. आता जलपर्णी वाढायला सुरुवात झाली आहे. ही जलपर्णी सध्या निम्म्याहून अधिक तलावाचा भाग व्यापून आहे.

या तलावाच्या चौफेर कृषी वनस्पती वाढून शेतकऱ्यांना वनस्पतीची माहिती व्हावी यासाठी पर्यटन केंद्र म्हणून निधी वितरीत करण्यात आला होता. जवळपास एक कोटी रुपयांतून सौंदर्यीकरणाचे काम झाले आहे. मात्र अजूनही काम निधीअभावी प्रलंबित आहे. असे असतानाच जलपर्णीने डोक वर काढल्याने ही जलपर्णी कशी नष्ट करता येईल, याकडे आता कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. बुलडाणा शहरातील संगम तलावातील जलपर्णीची वाढ झाली होती. दरम्यान ही जलपर्णी काढण्याकरिता नगरपालिकेने पुढाकार घेतला होता. मात्र अजूनही या तलावात काही ठिकाणी जलपर्णी आहे. ही जलपर्णी पोहण्यासाठी येणाऱ्या काही जलतरणपटूंनी काढण्याचा प्रयत्न झाला होता.

जलशुद्धीकरण करण्यात येणार होते
या तलावातील जल शुद्धीकरणाची तरतूद पर्यटन विकास कामात होती. जलशुद्धीकरण केल्यानंतर मुलांसाठी बागही येथे होणार होती. सध्या फक्त ट्रॅक उभारला आहे. मात्र इतर विकासात्मक बाबी राहिल्या आहेत. तलावात प्रचंड प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे. बेशरम ही वनस्पतीही येथे वाढत चालली आहे. त्यामुळे जलपर्णी व बेशरम वनस्पतीची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...