आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घुबडांच्या घटत्या संख्येवर कृत्रिम घरटे उपाय

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सृष्टी मंगलम प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात घुबडांसाठी लाकडी घरटे लावण्याचा छोटासा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम मोताळा तालुक्यातील पलढग, मारोती संस्थान वाघळी व बोथा वनपरिक्षेत्रात शास्त्रशुद्ध लाकडी घरटे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमात इतरही सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

वन परिक्षेत्रात उंच व मोठी झाडे तुरळक प्रमाणात उरली आहेत. त्यामुळे घुबडांचा अधिवास कमी होत चालला असून त्यांची संख्याही घटत चालली आहे. नैसर्गिक अधिवासाची संख्या मोजकीच असल्यामुळेच घुबडाला अंडी घालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. रानपिंगळा, गव्हाणी घुबड, श्रृंग घुबड ही घुबडं रानात तसेच शहरी भागात सुध्दा काहीशा प्रमाणावर आढळतात.

शहरी भागातील उंच जुन्या व पडक्या इमारती, वेशी, किल्ले व जुन्या शासकीय इमारतीत दृष्टीस पडतात. परंतु जुन्या इमारतींची जागा मल्टि कॉम्लेक्सनी घेतल्यामुळे त्या ठिकाणी घुबडाचा अधिवास दिसून येतो. या घुबडांच्या संख्येत वाढ होण्यास कृत्रिम घरटे हा एक चांगला पर्याय आहे. पक्षी मित्र संजय गुरव व सर्पमित्र विजय खंडागळे यांच्या संकल्पनेतून या घरट्यांची निर्मिती होत असून पक्षी प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. जेणेकरुन हा प्रकल्प संपूर्ण जिल्हाभर राबवण्यास सहकार्य होईल.

घुबड हा पक्षी मानवाचा तसेच शेतकऱ्याचा मित्र असून तो साप, उंदीर, घुस, सरडे, सस्तन प्राणी यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात मदत करतो. हिवाळ्यात भरपूर थंडी व धुक्याचे प्रमाण असल्यामुळे रस्ता अपघातात रानपिंगळा हा मृत्युमुखी पडतो. तसेच मानवी वस्तीतील घुबड रस्त्यावर टाकलेले विषारी पदार्थाने मेलेले उंदीर खाऊन मृत पावतात. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात असे तीन गव्हाणी घुबड पक्षी मित्र संजय गुरव व सर्पमित्र विजय खंडागळे यांना आढळून आले. आपल्या परिसरात पिंगळा, गव्हाणी व श्रृंग घुबडांचा वावर असल्यास सृष्टी मंगलम प्रतिष्ठानला कळवावे. या उपक्रमात वन्यजीव विभागाचे सहकार्य लाभत असल्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास पक्षी मित्र संजय गुरव यांनी व्यक्त केला आहे.

असे उपक्रम राबवणे गरजेचे
अशा प्रकारचे उपक्रम मानवी वस्तीत तथा वन परिक्षेत्रात राबवणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांत लावलेली वड, पिंपळ वृक्ष भविष्यात मोठी झाल्यावर निश्चितच घुबड पक्षांना नैसर्गिक अधिवास प्राप्त होईल.-दिनेश लोखंडे, वन परिक्षेत्र अधिकारी

बातम्या आणखी आहेत...