आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती:जिल्ह्यात अनेक स्थळे असल्यामुळे पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार

बुलढाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वन पर्यटनाची स्थळे आहेत. पर्यटनात लाभलेली ही वैविध्यता जिल्ह्याला संपन्न बनवू शकते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक गजभिये यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी या वर्षीच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने विशेष महत्व आहे, असे सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती ऋण व्यक्त करुन अभिवादन केले. विविधतेचे प्रतिबिंब जिल्ह्यात उमटले आहे, असे सांगून मातृतिर्थ सिंदखेड राजा, लोणार सरोवर, शेगाव, मेहुणा राजा यासोबत ज्ञानगंगा सारख्या वन पर्यटनामुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार करून उत्कृष्ट पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

पर्यटनामुळे रोजगारात वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाने बुलढाणा, नांदुरा आणि मलकापूर येथील हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीसाठी वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नागरिकांनी घरावर राष्ट्रध्वज उभारावा, यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले. यास नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या उपक्रमांबरोबर स्वराज्य महोत्सवही यशस्वी झाला आहे.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...