आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या विदर्भातील पंढरी श्रीक्षेत्र शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे २७ जुलै रोजी किनगावराजा शहरात आगमन झाले. भाविक भक्तांनी जल्लोषात स्वागत केले. हाती भगवे ध्वज, टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणी, भारुडावर पावली खेळणारे वारकरी, विविध रंगाच्या फुलांनी सजलेल्या पालखीत विराजमान झालेल्या योगी राजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. ‘गण गण गणात बोते’च्या गजराने अवघे शहरदुमदुमून गेल्याचे पाहावयास मिळाले.
वारीचे हे ५३ वे वर्ष असून पालखीसोबत ३ अश्व, १० वाहने, औषधोपचारांसह सुसज्ज रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर असा मोठा लवाजमा आहे. सकाळी सिंदखेडराजा येथून निघालेली पालखी दहा वाजेदरम्यान किनगाव राजा शहरात दाखल झाली. यावर्षी जेवणाच्या महाप्रसादाचे मानकरी बाळू केवट, ज्ञानेश्वर केवट, विनोद हरकळ,भारत हरकळ, संतोष शिंदे, प्रकाश शिंदे व नवीनसेठ कोटीच्या हे होते.
वारकऱ्यांना दूध, फळे, फराळ, बिस्किटाचे वाटप भाविकांनी केले. तर रहदारीस अडचणी होऊ नये यासाठी पोलिसांनी नागपूर-अौरंगाबाद हायवे वरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली होती. पालखी मार्गावर पोलिस प्रशासनाने जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता. मेहकर चौफुलीवर जड वाहने पालखी मार्गस्थ होईपर्यंत थांबवण्यात आली होती. पालखीसोबत पोलिसांची वाहने, अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात होते.
सातशेहून अधिक वारकरी पांढऱ्या शुभ्र पोषाखात दाखल
गत दोन वर्षांपासून झालेला पांडुरंग भेटीचा विरह. एखाद्या लेकीने माहेराला कैक दिवसानंतर जायला मिळाल्यावर त्या लेकुरवाळीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाला पारावर राहत नाही. तसाच काही भाव किनगावराजा शहरात गत दोन वर्षाच्या खंडानंतर आलेल्या श्रींच्या पालखीतील वारकरी मंडाळीच्या चेहऱ्यावर दिसत होता. सातशेहून अधिक वारकरी अंगावर पांढऱ्या शुभ्र पोषाखात व हातात भागवत धर्माचा भगवा घेवून गत दोन माहिने पंढरीच्या वाटेवर असतात तर परतीच्या प्रवासात दिंडी किनगावराजातून जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.