आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार अद्याप झाला नाही. आता तो होईल, अशी आशाही एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी सोडल्याचे दिसत आहे.
आता गेले ते दिवस
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आता मंत्री होण्याचे दिवस गेले, अशा शब्दांत यावर भाष्य केले आहे. बुलडाणा येथे जाहीर सभेत बच्चू कडू म्हणाले की, मी मंत्रिपदाची आशा आता सोडली आहे. आता गेले ते दिवस. मात्र, दुसऱ्यांदा सरकार येईल तेव्हा बच्चू कडू नक्की मंत्री होईल.
मंत्रिपद ही मोठी गोष्ट नाही
बच्चू कडू पुढे म्हणाले की, मंत्रिपद ही फार मोठी गोष्ट नाही. जनतेने दिलेले आमदारपद हे मंत्रिपदापेक्षा लाख पटीने मोठे आहे. आणि हे पद कुणीही आपल्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही. जनतेचे काम करण्यासाठी मंत्रिपद हे केवल एक हत्यार, शस्त्र असते. मात्र, हे शस्त्र नसले म्हणून माणूस थांबतो, असे थोडीच आहे. जनसामान्यांची कामे करत असताना माझ्यावर आतापर्यंत 350 गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही लोकांसाठी लढण्याची माझी जिद्द कायम आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आता 2024 नंतरच
दरम्यान, आपण लवकरच सत्तेत असणार, असे वक्तव्य मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, मनसेचा एकच आमदार आहे. मात्र, ते सत्तेत येऊ शकतात. मनसेला एखादे मंत्रिपद मिळाले तर नक्कीच राज ठाकरे सत्तेत येतील. पण आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मला वाटत नाही. आता मंत्रिमंडळाचा विस्तार 2024 नंतरच होईल.
विरोधकांमध्ये सर्व अनिश्चितता
महाविकास आघाडीची रविवारी मुंबईत वज्रमूठ सभा झाली. त्यावरही बच्चू कडू यांनी टीका केली. बच्चू कडू म्हणाले, विरोधकांमध्ये सर्व अनिश्चितता आहे. आज सभा घेत आहेत. पण, उद्या कोण कुठे राहील? हे सांगता येत नाही. अजित पवारांवर निशाणा साधत बच्चू कडू म्हणाले, गेल्या 15 दिवसांत राज्यात काय सुरू आहे, ते तुम्हाला माहिती आहे. सभा खूप मोठ्या होत आहेत पण नेत्यांना ते मंजूर आहे का? राहुल गांधींनी एवढी मोठी पदयात्रा काढली. खरेतर मी त्यांना मानतो. परंतु काँग्रेसच्या नेत्यांना या यात्रेबद्दल काय वाटते? असा सवालही बच्चू कडू यांनी केला.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका
दरम्यान, मुंबईत अमित शहा, देवेंद्र फडणवीस, बच्चू कडू यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यात आगामी निवडणूका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे ठरवण्यात आले, अशी चर्चा आहे. त्यावर बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जर पुढच्या निवडणुका लढल्या तर नक्कीच बरे होईल. तसेच, सत्ता संघर्षाच्या निकालामुळे राज्यातील सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावाही बच्चू कडू यांनी केला. बच्चू कडू म्हणाले, सत्ता संघर्षाचा निकाल, जनता आणि निवडणुका याचा कुठलाही संबंध नाही. सत्ता संघर्षाचा निकाल हा मर्यादित गोष्टींसाठी आहे, असा दावाही बच्चू कडू यांनी केला.
संबंधित वृत्त
ही दुर्बलांची भयभीत सभा, अमित शहांच्या भीतीने 3 पक्ष एकत्र आले; आशिष शेलारांची वज्रमूठ सभेवर टीका
महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा महाराष्ट्र दिनी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सवर पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले तिघांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या या सभेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी 'ही दुर्बळांची भयभीत सभा' असे म्हणत घणाघात केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.