आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:दाहकत्या उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा; कवडीमोल भावाने केळीची विक्री, शेतकरी त्रस्त

संग्रामपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून तालुक्यात सूर्य आग ओकू लागला आहे. मागील आठवड्यापासून उन्हाचा पारा ४३ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. या दाहकत्या उन्हामुळे कापणीवर आलेल्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या उन्हामुळे केळी घडाचे वजन व गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असून, हेक्‍टरी सरासरी दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

केळी हे उष्ण कटिबंधातील पीक असले, तरी त्याची वाढ ३५ ते ३८ डिग्री सेल्सिअस तापमानात चांगली होते. मात्र, तापमान चाळिशी वर गेल्यानंतर या पिकाचे मोठे नुकसान होते. तालुक्यात दीडशे हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. केळीचे पीक चांगले बहरात असतानाच मागील आठवड्यापासून तापमानाने ४३ अंश सेल्सियसचा आकडा पार केला आहे. त्यातच या आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट आल्याने ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कडक तापमानामुळे केळीची पाने पिवळी पडतात किंवा वाळतात, घड सटकतात, खोड मध्येच वाकून जमिनीवर कोसळते. झाड उभेच राहिले, तरी केळीच्या घडाच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. अशा घडाची चमक निघून जाते, केळीची गोलाई व लांबीवर परिणाम होतो. या तापमानामुळे एका घडाचे वजन चार ते पाच किलोने कमी होते. शिवाय केळीचा दर्जा घसरून वजनही कमी झाल्याने प्रतिघड चाळीस ते पन्नास रुपये म्हणजे एकूण वीस टक्के नुकसान होते. अशा केळीला क्विंटलला दोनशे किंवा तीनशे रुपये कमी भाव मिळतो. एका हेक्‍टरमध्ये किमान ३६०० झाडाची लागवड केली असेल, तर हेक्टरी सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान होते. मात्र तापमान वाढले की शेतकऱ्यांना सिंचन करावे लागते. त्यातच पाण्याची पातळी खोल गेल्याने कृषी पंप टप्प्या टप्प्याने चालवावे लागतात. सद्यःस्थितीत भूगर्भातील पाणीपातळी ऐंशी फूट खोल गेली आहे.

त्यातच कडक उन्हाळा तापत असल्यामुळे दिवसागणिक ही पाणी पातळी कमी होत आहे. पाणी नसल्यामुळे अनेक भागांतील विहिरी, कूपनलिका बंद पडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी लांबच्या शेतातून पाणी आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु वाढते तापमान आणि पाण्याअभावी केळी बागा करपू लागल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या केळीचे भाव स्थिर असले तरी कापणी मध्ये व्यापारी २०० ते ३०० रुपये कमी दराने केळीची मागणी करीत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे वेगळेच नुकसान होत आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची गरज
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देवून आपले लक्ष केळीच्या बागांकडे केंद्रीत केले आहे. तालुक्यात दिडशे हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी काही केळीच्या बागा काढणी वर आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्याने केळी बागांचे नुकसान होत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे.

दाहकत्या उन्हामुळे केळीच्या उत्पादनात घट येणार
केळी पिकांचा बचाव करण्यासाठी सिंचन, बागेभोवती उष्णता, वाऱ्यापासून बचावासाठी हिरवी जाळी लावणे, नैसर्गिक वारा अवरोधक याबाबतची नियोजन केले आहे. मागील वर्षी जूनमध्ये लागवडीच्या केळी बागांची निसवण पूर्ण झाली असून, अनेक बागांची काढणी सुरू आहे. या बागांमध्ये उष्णतेमुळे घड सटकणे, उष्ण वाऱ्यामुळे झाडे मोडून पडणे, अशी समस्या तयार झाली आहे.
-राजेश वाघ, केळी उत्पादक शेतकरी, टुनकी.

बातम्या आणखी आहेत...