आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एकतेचा संदेश देणारा दर्यापूरच्या ‘भवानी वेश’चा बाप्पा ; देशभक्तीसह सर्वधर्म समभावाचा देखावा

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या दर्यापुरातील भवानी वेश स्थित असलेल्या श्री हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळाने यंदाचे ८२ वे वर्षे आहे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मंडळाने देशभक्तीसह सर्वधर्मसमभावाची थीम अंगीकारली आहे. या मंडळाला मागील काही वर्षांत शासनाच्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दर्यापुरातील श्री हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र संग्राम सैनिक स्व. भगवानसिंह ठाकूर यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानुसार केली आहे. तेव्हापासून या मंडळाच्या माध्यमातून देशभक्तीसह सर्वधर्म व सर्व जाती एकत्र घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे कार्य सतत सुरू आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दर्यापुरातील तत्कालीन स्वातंत्र्य संग्राम सैनिक भगवानसिंह ठाकूर, गोविंदराव बिजवे, दत्तात्रय गोविंद चिकटे, परशुरामसिंह परिहार, लक्ष्मणराव खंडारे, तुकाराम हजारे, महादेवराव मुरडी व आदींनी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आणले होते. याच गणेशोत्सवातील व्यायाम शाळेच्या माध्यमातून दर्यापुरातील एडवर्ड हायस्कूलवर हल्ला चढवत आंदोलन करण्यात आले होते. दर्यापुरातील एडवर्ड हायस्कूलची स्थापना इंग्रजांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता केली होती. त्या शाळेत भारतीयांना प्रवेश नाकारण्यात आला होता. या गंभीर बाबीची दखल दर्यापुरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी घेत याविरुद्ध मोठे जन आंदोलन छेडण्याचा निर्धार केला होता.

मिरवणुकीदरम्यान गणेशोत्सवाला मानवंदना
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या गणेशोत्सवाकडे संपूर्ण पंचक्रोशीत बघीतले जाते. शेवटच्या दिवशी विसर्जन प्रसंगी दर्यापुरातील जामा मस्जिद परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने या गणेशाला मानवंदना देण्यात येते. गणेशोत्सवादरम्यान दररोज होणाऱ्या महाआरतीला सर्वधर्मीय आणि सर्वपंथीय नागरिक आवर्जून उपस्थित राहतात हे बघण्यासारखे आहे. या गणेशोत्सवाची सजावट ज्येष्ठ सजावटकार देविदास काळे यांनी केली असून, महाआरती गायन प्रा. गजानन सरदार करणार आहेत. गणेशोत्सवाच्या यशस्वीतेकरता श्री हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...