आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात करण्यात येते. मान्सून काळात जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी साथरोग प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पाणी गुणवत्ता विभागामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये पिण्याच्या पाण्याचे जलकुंभांची स्वच्छता मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे. तर मान्सूनपूर्व या तयारीला लागण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केली आहे.
जिल्ह्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी अधिनस्त कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी व पंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायतींचे जलसुरक्षक यांनी प्रत्येक स्रोतांचे सर्वेक्षण करून त्याचे अ. ब. क. असे वर्गीकरण करावयाचे आहे. त्यामध्ये प्रपत्र अ. (निळा), नळ पाणीपुरवठा योजना, प्रपत्र ब. (गुलाबी) हातपंप, पपत्र क. (पांढरा) विहीर अशी वर्गवारी असणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींना सौम्य जोखीम हिरवे कार्ड, मध्यम जोखीम पिवळे कार्ड, तीव्र जोखीम लाल कार्ड असे वाटप करण्यात येते.
ज्या ग्रामपंचायतींना मध्यम व तीव्र स्वरूपाची जोखीम असल्यास अशा ग्रामपंचायतींना दुषित पाणीपुरवठा होऊन साथरोगाचा उद्रेक होऊ शकतो. अशा ग्रामपंचायतींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्ड मध्ये देण्यात आलेल्या त्रुटींची तात्काळ पूर्तता केल्यास अशा गावांमध्ये उद्धभवणाऱ्या साथरोगाला आळा घालता येऊ शकतो. त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत.
या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी कार्यवाही करताना तीन महिने पुरेल इतका ब्लिचिंग पावडर साठा उपलब्ध ठेवणे, ग्रामपंचायत वाडी-वस्ती वरील सर्व पिण्याचे पाण्याचे नमुने जैविक तपासणी करिता पाठविणे, अधिग्रहीत केलेल्या स्रोतांचे पाणी नमुने तपासणी केल्याशिवाय पिण्यासाठी वापरू नये, ग्रामपंचायतीत टी.सी.एल. नोंदवही व पाणी नमुने तपासणी नोंदवही अद्यावत ठेवणे, ब्लिचिंग पावडर चे प्रमाण तपासून शुद्धीकरण करणे, पुर्नतपासणी पाणी नमुना पुन्हा दूषित आढळल्यास सदरच्या स्त्रोतांवर पिण्यास अयोग्य असा फलक लावणे, लाल पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींनी सर्व स्रोतांची व नळ पाणी पुरवठा योजनांची पाहणी करुन असलेल्या दोषांचे निराकरण करणे, गावातील सांडपाणी व नाल्या वाहत्या करणे, झरे दूषित असल्यास टी. सी.एल. चा वापर करणे या बाबी करणे आवश्यक आहे.
साथरोगाचे धोके टाळा
मान्सून काळात जोखीम असलेल्या गावांमध्ये साथरोग उद्भवणार नाहीत यासाठी वरील सर्व बाबींचे तंतोतंत पालन करून होणारे संभाव्य धोके टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सर्व ग्रामपंचायतींना केले आहे.
जल शुद्धीकरण मोहीम १५ जूनपर्यंत
पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ पावसाळ्यापूर्वी स्वच्छ धुऊन स्वच्छ केल्याचा दिनांक त्यावर पेंटने टाकणे याबाबतची मोहीम ७ जून पर्यंत जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. तसेच सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची १५ जून या कालावधीत टी. सी.एल. पावडर टाकून शुद्धीकरण करून घेण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याबाबतचे सनियंत्रण उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद, बुलडाणा हे करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.