आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक अनुदान:पीएम आवासचे लाभार्थी अनुदानापासून वंचित; शिवसंग्रामचे निवेदन

देऊळगाव राजा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्की घरे नसलेल्या शहरातील गरजू व्यक्तींचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. मात्र, स्थानिक नगर परिषद ने डीपीआर प्लॅन नुसार शासनाला पहिली यादी सादर करून देखील अद्यापही लाभार्थी घरकुल योजनेच्या अनुदानापासून वंचित आहे. अनुदान मिळत नसल्याने गरजू कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होतांना दिसत नाही. मंजूर झालेल्या डीपीआर मधील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्याकडे १ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.

येथील पालिकेच्या माध्यमाने शहरातील ज्या कुटुंबाकडे पक्की बांधलेली घरी नाहीत अशा गरजू नागरिकांसाठी प्रधानमंत्री योजने अंतर्गत प्रत्येकी २ लाख ६० हजार रुपये अनुदान देण्यात येते.आवास योजनेच्या निकषाला अधीन राहून शहरातील गरजू व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात आले होते. डीपीआर प्लॅन नुसार सदर योजनेच्या २७१ लाभार्थ्यांची पहिली यादी काही महिन्यापूर्वी मंजूर करून शासनाकडे सादर करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून सदर लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पहिला हप्ता देखील मिळालेला नाही. आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी कागद पत्राची जुळवाजुळव करून लाभार्थ्यांनी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केला आहे. पहिल्या डीपीआर यादीमध्ये नाव आल्याने व आवास योजनेचे अनुदान स्वरूपात पैसे मिळणार या आशेने अनेक लाभार्त्यांनी खाजगी कर्ज घेऊन घराचे बांधकाम देखील सुरू केले आहे. मात्र शासनाकडून अनुदान मिळण्यास दिरंगाई होत आहे. पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव येऊन देखील घर बांधण्यासाठी शासनाकडून पैसे मिळत नसल्याने पालिका प्रशासना विरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. पालिका प्रशासनाने आपल्या स्तरावरून योग्य तो पाठपुरावा करून मंजूर झालेल्या पहिल्या डीपीआर मधील लाभार्थ्यांना तत्काळ अनुदानाचा लाभ द्यावा, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, शे.राजू, असेफ इनामदार आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...