आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिसरातील साठेगाव येथे माघ पौर्णिमेनिमित्त (दांडी पौर्णिमा) रविवारी, दि. ५ फेब्रुवारी रोजी यात्रोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणापासून साठेगाव, निमगाव गुरू आणि नारायणखेडसह परिसरातील गावांंना ‘दांडी पौर्णिमे’चे म्हणजे माघ पौर्णिमेचे वेध लागतात. साठेगाव, निमगाव गुरू आणि नारायणखेड या तिन्ही गावांच्या मध्यात खडकपूर्णा व आमना नदीचा संगम आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर महादेवाचे पुरातन मंदिर आहे.
नवसाला पावणारा महादेव अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. रविवारी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. दुपारी तीन वाजेनंतर महाप्रसाद आणि रात्री हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज हुसे यांचे कीर्तन झाले. भाविकांकडून सांगितले जाते की, सुमारे शंभर वर्षांपूर्वी साठेगाव परिसरात एक तपस्वी आले होते. त्यांचे नाव विश्वनाथ महाराज. त्यांनी काही जणांच्या मदतीने तिन्ही गावांमधून त्याकाळी ज्वारी, डाळ, मीठ, मिरची, तेल देणगी स्वरुपात जमा करून दांडी पौर्णिमेला भंडारा करण्याचे ठरवले. त्यानंतर सुरू झालेली भंडाऱ्याची परंपरा आता शेकडो वर्षांनंतरही कायम आहे. या वर्षीही तिन्ही गावांमधील भाविकांनी एकत्र येऊन यात्रोत्सवात महाप्रसादाचे आयोजन केले. यात्रोत्सवात भाविकांना महाराजांच्या ‘साठेगाव हे पंढरपूर, सर्व संताचे माहेर’ या ओळींचे स्मरण झाले.
सोहळ्याचे वैशिष्ट्य दांडी पौर्णिमा ही या परिसरात संक्रांती नंतर सणाची दुसरी पर्वणी असते. सासरी असलेल्या या परिसरातील महिलाही श्रद्धेमुळे दांडी पौर्णिमेला (दांडी न मारता) न चुकता येत असतात. हे या परिसरातील एक वैशिष्ट्य समजले जाते.
महाप्रसादाची परंपरा दांडी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात साठेगाव येथे विश्वनाथ महाराजांचे कीर्तन होत असे. त्यामध्ये गावाचे वर्णन करताना ‘साठेगाव हे पंढरपूर, सर्व संताचे माहेर’ असे महाराज नेहमी म्हणत असत. त्यांनी ठरवून दिलेली देणगीतून साहित्य गोळा करून भंडाऱ्याची म्हणजेच महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे. या महाप्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जात-पात असा भेदभाव न करता सर्वजण एकाच पंगतीत महाप्रसाद घेतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.