आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना भारत विद्यालयातील एका कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर पथकाने मुख्याध्यापकासह चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. आराेपी मध्ये दोन खासगी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई ३ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील वावरे ले आऊट रहिवासी तक्रारदाराच्या मुलास अंशत: अनुदानित यादीनुसार भारत विद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा होता. परंतु विज्ञान शाखेत प्रवेश देण्यासाठी वस्तीगृह कार्यवाहक गजानन सुखदेव मोरे वय ३८ या कर्मचाऱ्याने मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड वय ५३ यांच्या वतीने प्रथम पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली. तर खासगी कर्मचारी जितेंद्र प्रल्हाद हिवाळे याने तक्रारदारास लाच देण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने भारत विद्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी लेखापाल राहुल विष्णु जाधव यांनी मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरुन दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने उपरोक्त चारही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. या कारवाईमुळे शहराच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वृत्त लिहिपर्यत आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक एस.एन.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, सहायक पोलिस उपनिरिक्षक भांगे, पोहेकॉ विलास साखरे, राजू क्षीरसागर, मो. रिजवान, विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोलिस कर्मचारी अ. काझी, स्वाती वाणी यांच्या पथकाने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.