आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा झाली आयएसओ:ग्रामस्थांच्या मदतीने भरोसा जि. प. शाळेचे रुप पालटले

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रामनगर भरोसा येथील जिल्हा परिषद शाळा शासनाने नुकतीच आयएसओ जाहीर केली आहे. त्यासाठी गावकरी व शासकीय सेवेतील शाळेचे माजी विद्यार्थी समोर आल्याने शाळेत कार्यरत आलेल्या शिक्षकांना दुप्पट ऊर्जा मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. ६५६ लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात ७९ जण शासकीय सेवेत कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांनी शाळेला भरघोस आर्थिक मदत करून शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.

शाळा समितीच्या वतीने शाळेत दिवाळी निमित्त गावी आलेल्या व शाळेला मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी रामेश्वर भगत होते. तर प्रमुख उपस्थिती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव पाटील, सरपंच गणेश थुट्टे, अर्चना शिंदे, शिवाजीराव लेंडे, कैलास भगत, साधना भगत, वैजनाथ शितोळे, अंबादास शिंदे, अंकुश भगत, भगवान होळकर, मोहन भगत, दीपक कदम, मुरलीधर भगत, प्रकाश होळकर आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक दिलीपराव गाडेकर यांनी गावकऱ्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीची प्रशंसा केली.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले शिवाजीराव लेंडे यांनी आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाळेसाठी केव्हाही आर्थिक किंवा इतर बाबतीत हाक द्या आम्ही मदतीला हजर राहू. भविष्यात रामनगर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण व्हावी त्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगून त्यांनी शिक्षक दिलीपराव गाडेकर आणि संतोषराव थुट्टे यांनी कठोर मेहनत घेऊन विद्यार्थी घडवावे, असे आवाहन केले. तर मूर्तिजापूर येथे कार्यरत कैलासराव भगत यांनी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण नंबर एक आहे. हे रामनगरच्या शाळेने दाखवून दिले आहे.

या शाळेने शेकडो विद्यार्थी घडवले असून जवळजवळ ७९ कर्मचारी निर्माण केले आहेत. यापुढे सुद्धा आपल्याला यश गाठायचे असेल तर फक्त शिक्षकांनी थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच पालकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. देशात सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून इंग्लिश शाळेचे पेव फुटले आहे. आता पालकांनी मार्कांच्या जंजाळात न अडकता गुणवत्ता तपासावी, असे सांगितले. रामनगर शाळेला गुणवत्तेचा वारसा लाभला आहे. या शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे त्याबद्दल शिक्षकांचे आणि गावकऱ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन दिलीपराव गाडेकर यांनी तर आभार संतोष थुट्टे यांनी मानले.

७९ कर्मचारी कार्यरत
६५६ लोकसंख्या असलेल्या भरोसा गावात ७९ शासकीय कर्मचारी आहेत. त्यामध्ये २० भारतीय जवान, ७ डॉक्टर, ३ मंत्रालय कर्मचारी व ४९ कर्मचारी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...