आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भीमजयंती निमित्त कार्यक्रमांना झाली सुरूवात; सामाजिक समता कार्यक्रमांतून करणार महामानवास अभिवादन

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती ६ एप्रिलपासून सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. भीम जयंतीच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली असून त्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार ७ एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ८ एप्रिल रोजी जिल्हा व विभाग स्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे.

९ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवण्यात येणार असून जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहेत. १० रोजी समता दूतांमार्फत लघुनाट्य, पथनाट्याच्या माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. ११ रोजी म. ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात येईल. १२ एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

१३ एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम होईल. १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेले कार्यालये, शाळा, वसतिगृहे अादी आस्थापनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करून व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले आहे. १५ एप्रिल रोजी प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबवण्यात येईल.

१६ एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबवला जाणार आहे. कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन आज ६ एप्रिल रोजी सहायक आयुक्त कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज मेरत यांनी तर आभार प्रदीप धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सतीश बाहेकर यांनी केले.

जात पडताळणी कार्यालय १४ रोजी सुरू राहतील
बाबासाहेबांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...