आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअत्यंत गरिबीची परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यास महावितरणने दहा वर्षांपासून कृषी वीज जोडणी तर दिलीच नाही. याबाबत शेतकऱ्याने विचारणा केली असता ३६ हजार ९७० रुपयांचे वीज बिल शेतकऱ्याच्या हाती दिले आहे. हा प्रताप महावितरण जळगाव जामोद कार्यालयाने केला असून शेतकऱ्याची आणि कृषी अनुदान लाटण्यासाठी शासनाचीही फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील स्व. प्रल्हाद विष्णाजी करांगळे यांनी त्यांच्या मालठाणा बुद्रुक शिवारातील गट क्रमांक ६८ मधील शेतात ५ एच पी भाराच्या कृषी वीज जोडणीसाठी रुपये ८ हजार ८०० रुपयाची अनामत रक्कम मागील ५ एप्रील रोजी जळगाव जामोदच्या महावितरण कार्यालयात भरणा केली होती. त्यानंतर शेतकरी प्रल्हाद विष्णाजी करांगळे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा गजानन प्रल्हाद करांगळे याने संबंधित कार्यालयाकडे अनेकदा चौकशी केली. दरवेळी त्यांना पुढील वर्षी जोडणी देण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र आपल्या वीज जोडणी बाबत नेमके काय सुरू आहे, हे जाणून घ्यायच्या उद्देशाने गजानन करांगळे यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या ठोकला.
त्यावेळी कार्यालयाने वीज जोडणी न देता ३६ हजार ९७० रुपयाचे बिल त्यांच्या हातात दिले. हे बिल पाहून करांगळे यांना जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यालयास लेखी अर्जाद्वारे कृषी वीज जोडणी न देता वीज बिल कसे आले, अशी विचारणा केली. मात्र संबंधितांनी काहीही न कळवल्यामुळे गजानन करांगळे यांनी वीज ग्राहक संघटनेस मदतीचे आवाहन केले. त्यानुसार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागळे यांच्या माध्यमातून महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे १ जुन तक्रार दाखल करून महावितरणने त्यांच्या नावाचा वापर करून शासनाकडून कृषी वीज बिल अनुदान लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच वीज जोडणी न देता दिलेले खोटे वीज बिल रद्द करून वीज अधिनियमाच्या कलम ४३ उपकलम ३ नुसार संबंधितांवर ५ एप्रिल २०१३ पासून प्रतिदिन एक हजार रुपये याप्रमाणे दंड करून ती रक्कम शेतकऱ्यास नुकसान भरपाई म्हणून देण्याची तसेच या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे.
शेतकरी हितासाठी हा लढा सुरूच राहणार
एकीकडे महावितरण शेती वीज बिल वसुली बाबत आकांडतांडव करत आहे, मात्र वीज जोडणी न देताच हजारो रुपयांचे बिल देऊन लाखोंचे अनुदानही लाटले जात आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर शासन व महावितरणने कारवाई करावी. यासंदर्भात वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरूच राहणार आहे.
-प्रमोद खंडागळे, जिल्हाध्यक्ष वीज ग्राहक संघटना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.