आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रेशखर बावनकुळेंची टीका:उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचे..!; मुख्यमंत्री कोणत्या नंबरवर आहेत हे ग्रामीण भागाला किंवा व्यावसायिकांना विचारा?

सिंदखेड राजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील युवक मोंदीच्या नेतृत्वात एकत्र

महाविकास आघाडीचे सरकार कुचकामी असून मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री केवळ आपल्या मतदार संघापुरते मर्यादीत असल्याची टिका भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या पश्चिम विदर्भातील युवा वॉरियर्सच्या कार्यक्रमाची सुरुवात सिंदखेड राजा येथुन 23 ऑगस्ट रोजी करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते महाविकास आघाडीच्या कारभाराविरुध्द बोलत होते. यावेळी युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल लोणीकर, कार्यक्रमाचे आयोजक तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार तोताराम कायांदे, प्रभाकर मांते, विष्णु मेहेत्रे आदींची उपस्थिती होती.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उर्जामंत्री ना. नितीन राऊत यांच्यावरही टीका केली. बावनकुळे म्हणाले की, नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफ करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेचा आपल्यालाही आनंद झाला होता, परंतु पुढील काही महिने वाट पाहिल्यानंतरदेखील वीज बिलाची ही माफी झाली नाही. यावर विचारले असता वीज मंत्री उपमुख्यमंत्री निर्णयावर सह्या करीत नसल्याची दर्पोक्ती राऊत यांनी केली होती. मुळात शेतकऱ्यांना या राज्यातील नागरिकांना 100 युनिट वीज माफी मिळायला पाहिजे होती.

ओबीसी किंवा मराठा आरक्षण या सरकारला घ्यायचेच नाही. केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून मोठे काम केले आहे. मात्र या सरकारला नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याची गरज वाटत नाही, असे सांगून नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याची मागणी त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण टिकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एक नंबरवर आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न होतो आहे. पण ग्रामीण भागात विचारा किंवा व्यावसायिकांना विचारा राज्याचे मुख्यमंत्री कोणत्याच नंबरला असणार नाहीत असे सांगून बावनकुळे यांनी मुख्यमंत्री यांच्या संदर्भातील विरोधका करीत असलेल्या चर्चेला उत्तर दिले.

राज्यातील युवक मोंदीच्या नेतृत्वात एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या राज्यातील युवक एकत्र झाला असून युवकांच्या उत्तम भविष्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा यापुढे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे युवक राजकारणात थेट येवू शकत नाही अशा युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा मोर्च्यासाठी काम करावे अशा सर्व युवकांचे या संघटनेत स्वागत आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...