आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदेश:फायर ऑडिट लवकर करा, अन्यथा मान्यता रद्द करणार; रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

बुलडाणा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आक्रमक; लसीकरण, स्वॅब, तपासणी अहवाल व लॉकडाऊनचाही घेतला आढावा
  • दिवसभरात 1264 पॉझिटिव्ह तर 8 बाधितांचा मृत्यू बेड, व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनची जिल्ह्यात कमतरता

जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील फायर ऑडिट लवकरात लवकर करून घ्या, जे खासगी कोविड रुग्णालय आठ दिवसांत फायर ऑडिट पूर्ण करून घेणार नाही, अशा खासगी कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द करा, असे सक्त आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, उपजिल्हाधिकारी अहिरे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपविभागीय स्तरावर खामगाव, सिंदखेडराजा, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद येथे मान्यता देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लँटची निर्मिती युद्धपातळीवर करण्यात यावी, तसेच खासगी व शासकीय रुग्णालयाला लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्यासंदर्भात वेळेवर मागणी न करता यासंदर्भात प्रत्येक तहसीलस्तवर एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडून अगोदरच आढावा घेऊन मागणी नोंदवावी, असे आदेश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्यात काही लोक रेमडेसिविरची काळाबाजारी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खासगी रुग्णालयात रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यावर खाली झालेल्या बॉटलवर त्या रुग्णांचे नाव टाकण्याच्या सूचना देण्यात याव्या व त्याचे वेळोवेळी ऑडिट करावे. जे रुग्णालय याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी देखील रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा सूचना पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी लसीकरणाचा, स्वॅब तपासणी अहवाल व लॉकडाऊनचा देखील आढावा घेण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण फार गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. तसेच लॉकडाऊनची काटेकोरपणे पोलिस विभागाने अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमेवर कडक बंदोबस्त ठेवावा. विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व येणाऱ्यांवर कारवाई करावी. लग्नांमध्ये नियमांपेक्षा जास्त मंडळी असल्यास त्यांच्यावर देखील कडक कारवाही करावी, असे सक्त आदेश पोलिस प्रशासनाला यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांचा कोणताच प्रभाव नाही
व्हेंटिलेटरवर खरेदी बाबत भाजप आमदार आरोप करत आहेत. त्यात काय तथ्यता आहे. पंतप्रधान केअर फंडचा उपयोग कशा पध्दतीने करण्यात आला. त्याचा जर उपयोग झाला तर यंत्रणा आता का अपुरी पडत आहे. याचा कोणताच मागमूस घेतला जात नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा कोणता प्रभाव नाही अन् पालकमंत्री यांची प्रशासकीय यंत्रणेवर पकड नाही. असेच चित्र सध्या जिल्ह्यात असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा आहे.

आजची कोरोना परिस्थिती
बुलडाणा शहर व तालुक्यात ३४३, खामगाव शहर व तालुका ६८, शेगाव शहर व तालुका ४५, देऊळगावराजा शहर व तालुका २६, चिखली शहर व तालुका ९५, मेहकर शहर व तालुका १८३, मलकापूर शहर व तालुका ६७, नांदुरा शहर व तालुका १०५, मोताळा शहर व तालुका १३५, लोणार शहर व तालुका ९४ रुग्ण आहेत.

जिल्ह्यात एकही ऑक्सिजन उत्पादक नाही

जिल्ह्यात एकही ऑक्सिजन उत्पादक नाही. त्यामुळे जिल्ह्याला आवश्यक असणारा मेडिकल ऑक्सिजन हा बाहेरील जिल्ह्यातून बोलवावा लागतो. प्रसंगी ऑक्सिजनअभावी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. तरी जिल्ह्यातील नागरिक, उद्योजक, ऑक्सिजन लागत असलेली रुग्णालये यांनी पुढे येत ऑक्सिजन निर्मिती प्लँट बसवावे. जेणेकरून ऑक्सिजन अभावी रुग्णाला आपले प्राण गमवावे लागणार नाहीत. ऑक्सिजन निर्मिती करू इच्छित असेल तर त्यांनी पुढे यावे. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे परवाना मिळण्यासाठी संपूर्ण मदत करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...