आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात तणावपूर्ण वातावरण:जीभ घसरलेल्या आ. गायकवाड यांच्यामुळे दुसऱ्या दिवशीही बुलडाण्यात राडा; कुटेंची गाडी फोडण्याचा प्रयत्न, दोन्ही गट आक्रमक

बुलडाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी आमदार विजयराज शिंदेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना जीभ घसरल्यानंतर बुलडाण्यात झालेली विजयराज शिंदे यांना मारहाण, पुतळा जाळल्याचे प्रकरण आदी प्रश्नांवरुन शिवसेना अन् भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. त्याचे पर्यावसान आ. संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण जे बोललो त्यावर अजूनही ठाम असल्याची भूमिका मांडत शिवसेनेच्या वतीने भाजपच्या नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असल्याचे सांगत सध्या आपण शांत असल्याचे सांगितले. आ. संजय कुटे यांनी आपण या प्रकरणाला येथेच विराम देत असून हा अपयशी महाविकास आघाडीचा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे विधान करत आपण पैलवान नसल्याने कुस्ती करु शकत नाही. लोकांनी आपल्याला विकासासाठी निवडून दिलेले आहे, मारामारी करण्यासाठी नाही असे सांगत आ. संजय गायकवाड यांनी दिलेल्या चॅलेंजलाही मूठमाती दिली. परंतु, मतदार संघाकडे जात असतानाच त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली व बुक्क्याही मारण्यात आल्याने प्रकरण चांगलेच तापले होते. आ.कुटे यांनी पोलिस स्टेशनला ठिय्या देण्याच्या केलेल्या आवाहनानुसार बुलडाणा गाठले होते.

दुपारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटून गुन्हे दाखल करण्याची मागणी करत त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. आ. श्वेता महाले, माजी आ. चैनसुख संचेती, माजी आ. विजयराज शिंदे, जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, संतोषराव देशमुख, मोहन शर्मा, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनिल देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, डॉ. गणेश मांन्टे, सभापती श्रीमती तायडे, विजया राठी व पदाधिकारी उपस्थित होते. तर आ. संजय गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उप जिल्हा प्रमुख भोजराज पाटील यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आ. संजय कुटे यांची गाडी जयस्तंभ चौकातून पुढे जात असताना चावडीजवळ त्यांच्या गाडीला बुक्का मारण्यात आला. त्यानंतर पुढे हनवतखेड रस्त्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. माहिती मिळताच चिखलीकडे निघालेल्या आ. श्वेता महाले, माजी आ. विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे यांचेसह भाजपचा ताफा या ठिकाणी पोहाेचला. भाजपचा ताफा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे परतला. पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांचेसोबत आ. संजय कुटे, आ. श्वेता महाले, विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, चैनसुख संचेती यांची चर्चा झाली.

आ. संजय गायकवाड काय म्हणाले?
जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून हे सरकार बदनाम कसे होईल, ते कसे पडेल, हे राजीनामे कसे देतील, याकडेच भाजप नेत्यांचे राजकारण सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फुकटचे सल्ले देऊ नये, आम्हाल सल्ले देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी केंद्र सरकारला सल्ले द्यावेत. त्यांचेकडेच तळीराम आहेत. त्यांनी आम्हाला म्हणू नये, आपण नितेश राणे यांना फोन केला होता. परंतु, त्यांनी तो उचलला नाही. आम्हाला राजकारण करायचे नाही.

या कोरोनात लोकांना ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही. रेमेडिसिविर इंजेक्शन मिळत नाही. हा भाजपच्या लोकांनी केलेला राष्ट्रद्रोह आहे. महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात कोरोनाने लोक मरत आहेत. त्यामुळे आपण कालचे विधान केले होते. आपण त्या विधानावर ठाम आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले. एकही शब्द बोलायचा नाही. लोकच आपला निर्णय यांना देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आ. संजय कुटे काय म्हणाले?
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण, प्राणवायूची निर्मिती, रेमडेसिविर औषधी व दवाखान्यात लागणाऱ्या खाटांची कमतरता सर्व सुविधांचे अपयश लपवून स्वतःचे पाप झाकण्यासाठी केंद्र सरकार व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गलिच्छ भाषेत बेताल वक्तव्य करण्याचा एकमेव कार्यक्रम राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते करीत आहे. दररोज तीनही पक्षांचे नेते राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहे.

बुलडाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे सुद्धा कोरोना काळात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी अशोभनीय शिवराळ भाषेत वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. सत्तेची मस्ती, माज व कुस्तीसाठी जनतेने निवडून दिले नाही. केंद्र सरकारने आजपर्यंत इतर राज्यापेक्षा सर्वाधिक कोरोनाग्रस्तांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधी दिला आहे. तसेच सर्वतोपरी मदत केली आहे. या संदर्भात राज्यातील तीनही पक्षांतील नेते बोलत नाही. त्या उलट घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून भाजपला बदनाम करत आहे.

माजी आमदार विजयराज शिंदेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
जयस्तंभ चौकात झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही गटाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुतळा जाळल्याप्रकरणी, शिवीगाळ प्रकरणी, मारहाण प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विजयराज शिंदेंसह भाजपाचे प्रभाकर वारे, सिध्दार्थ शर्मा, सोनु बाहेकर, यांचेसह अन्य लोकांविरुध्द श्रीकृष्ण शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी प्रकरण चौकशीवर आहे. या प्रकरणी आ. संजय कुटे, आ.श्वेता महाले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना जाब विचारला आहे. गुन्हे दाखल करण्यावरुन पोलिस व भाजपात भविष्यात सामना रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...