आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बुलडाणेकर रोज खातात 10 किलो भाजलेली माती; कॅल्शियम, आयर्न मिळत असल्याचा दावा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणी माती खाल्ली की पाठीत धपाटा बसायचा. माती खाल्ल्याने जंत होतात असे डॉक्टरही सांगायचे. त्यामुळे माती खाण्यावर बंदी होती. परंतु, हीच माती भाजलेल्या स्वरुपात सध्या बुलडाणेकर विकत घेऊन खाताहेत. तब्बल दहा किलो मातीची विक्री होत असल्याची आश्चर्यकारक बाब आहे.

शहरात फुटाणे व खारे शेंगदाणे विक्रीची दुकाने आहेत. हा धंदा सध्या तेजीत आहे. या सोबतच माती विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. लोक माती विकत नेतात, असे जेव्हा दुकानदार सांगतो तेव्हा आश्चर्य वाटते. दहा रुपये पावकिलो या भावाने माती विकली जाते. ही माती चंद्रपूर, पारस, अकोला येथून खामगाव येथे विक्रीसाठी येते व तेथून बुलडाणा शहरात विक्रीसाठी येते. या मातीत असे काय आहे की लोक ती विकत नेत आहेत, असा प्रश्न विचारला असता विक्रेत्याने आपल्याला जास्त माहीत नाही, पण लोक म्हणतात यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने महिलांना खाण्यासाठी दिली जाते. शक्यतो मासिक पाळी किंवा गरोदर महिलांना हमखास दिले जात असल्याचे विक्रेत्याचे म्हणणे आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर जसा सुवास येतो तसा वास या मातीला खाताना जाणवतो.

अनेक लोकांची भाजलेल्या मातीला मागणी आहे
अनेक लोकांना माती विक्री केली जाते हे माहीत नव्हते. परंतु, आम्ही त्याबाबत माहिती देत असतो. दररोज एकट्या आमच्याच दुकानातून दोन ते अडीच किलो माती विकली जाते. इतर दुकानांबद्दल माहिती नाही. पण सर्वच दुकानात ती विकली जाते. ही माती महिलांसाठी नेली जात असल्याचे आम्हाला कळते.
-सांडू घट्टे, विक्रेता

आयर्न असले, तरी ते खाणे घातकच
चाळीस वर्षापूर्वी महिला या मातीचा वापर खाण्यासाठी करायच्या. यातून महिलांना आयर्न मिळायचे त्यात अजूनही काही गुणधर्म आहेत. परंतु, आता कॅल्शियम असो वा आयर्न असो इतरही खनिज असो. त्याकरता औषधे तयार झाली आहेत. आता माती खाणे ही आरोग्यासाठी घातकच आहे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. शरीरातील रक्तावर परिणाम होतो. अनेकाविध आजार होण्याची संभावना आहे.
डॉ. गजानन पडघान, आयुर्वेद चिकित्सक, बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...