आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भरधाव रुग्णवाहिकेचे अचानक टायर फुटले. त्यामुळे नियंत्रण सुटलेल्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन कुटुंबातील पाच जणांना चिरडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींत एका चार वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना १६ मार्चच्या रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास बुलडाणा शहरातील त्रिसरण चौकात घडली. या अपघातात पती-पत्नी ठार झाल्यामुळे त्यांचे ४ वर्षीय बालक पोरके झाले आहे.
चिखली-खामगाव मार्गावर त्रिसरण चौकात घिसाडी समाजाच्या पडोळकर व सोळंके या दोन कुटुंबांनी रस्त्याच्या कडेला पाल ठोकले आहेत. विळे, कुऱ्हाडी, तवे असे लोखंडी साहित्य तयार करून व त्याची विक्री करून ते उदरनिर्वाह करीत होते. दिवसभर काम करून थकलेल्या या कुटुंबातील सदस्य रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास एमएच २८-७१३६ या क्रमांकाची रुग्णवाहिका चिखलीवरून बुलडाण्याकडे भरधाव येत होती. चौकात अचानक रुग्णवाहिकेचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडले. ही रुग्णवाहिका कोलवड येथील योगेश पुंजाजी जाधव यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी चालक-मालकासह रुग्णवाहिका ताब्यात घेतली.
उपचारांदरम्यान एक मृत्यू
अपघातात अनिल गंगाराम पडोळकर (२९) यांचा जागीच मृत्यू झाला. बेबाबाई शेषराव सोळंके (३५), आकाश अनिल पडोळकर (४), शेषराव लक्ष्मण सोळंके (४०) व मायाबाई अनिल पडळकर (३०, सर्व रा. पारधीबाबा मंदिराजवळ चिखली) हे चार जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी मायाबाईंवर अकोल्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
रस्त्याच्या कडेला झाेपलेल्यांना चिरडणारी हीच ती रुग्णवाहिका.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.