आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर गावठाण्यातील जागेची नोंदणी करण्यासाठी व शासकीय घरकुल योजनेच्या पात्रतेसाठी जागेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्डची आवश्यकता आहे. मात्र शहरातील नागरिकांना भूमि अभिलेख कार्यालयाकडून अद्यापही प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड देण्यात आले नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शहरात प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड योजनेची अंमलबजावणी करून तात्काळ पी आर कार्ड वाटप करण्यात यावे, अन्यथा शिट्टी बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेने भूमि अभिलेख उपअधीक्षकांना दिला आहे.
भूमि अभिलेख उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरांमधील गावठाणातील जागेची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्डची मागणी केल्या जात आहे. तसेच पंतप्रधान आवास योजना व इतर घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी जागेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड ची मागणी केल्या जात आहे. मात्र भुमी अभिलेख कार्यालयाकडून शहरातील जागेचे प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड अद्याप पर्यंत तयार झालेले नाही.
गावठाण्यातील जागेच्या प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड संदर्भात भुमि अभिलेख कार्यालयाकडून अद्यापही कोणतीच कार्यवाही सुरू नाही. प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड तयार करण्यासठी मागील काही वर्षांपूर्वी शासनाने भूमि अभिलेख विभागाकडे रीतसर पैसे देखील भरले आहे. परंतु बरेच वर्ष होऊन देखील शहरातील नागरिकांचे प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड तयार झालेले नाही. जिल्हयातील इतर शहरात प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड तयार करून वितरीत करण्यात आले आहे. मात्र देऊळगावराजा येथील भूमि अभिलेख कार्यालय प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड योजनेबाबत उदासीन दिसत आहे. परिणामी भूमि अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे.
गावठाण्यातील जागेची नोंदणी करण्यासाठी प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्डची सक्तीने मागणी केल्या जात असल्याने नागरिकांना नोंदणीचे व्यवहार करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जागेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्डची मागणी होत असल्याने लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे भूमि अभिलेख कार्यालयाने तात्काळ शहरात सर्व्हे करून प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड तयार करावे, अन्यथा शिट्टी बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत खान, शे.राजू, असलम खान, संतोष हिवाळे यांच्यासह आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.