आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मोहीम:अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांचे ‘कारवाई शतक’ ; मांजापासून गांजापर्यंत 282 आरोपींवर कारवाई

नाना हिवराळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्पर पोलिस अधीक्षक पदाची सुत्र हाती घेतल्यापासून एएसपी श्रवण दत्त एस. यांच्या पथकाने अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात त्यांनी मांजापासून ते गांजापर्यंत एकूण १०७ कारवाया केल्या असून त्यामध्ये १ कोटी १६ लाख रूपये किमतीचा माल जप्त करत, २८२ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. बुलडाणा जिल्हा विस्ताराने मोठा असल्याने जिल्ह्याचे घाटावर व घाटाखाली असे दोन भाग ओळखले जातात. खामगाव अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय असुन श्रवण दत्त एस. हे मागील ७ ऑक्टोबर २०२१ रोजी खामगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणुन रुजू झाले. अवैध धंदे करणाऱ्यांच्या आहारी जात त्यांना सहकार्य करणाऱ्या शेकडो तरुणांची गुन्हेगारी जगताकडे होत असलेली वाटचाल ही समाजासाठी धोकादायकच आहे. कोणत्याही अवैध धंद्यांचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात. रेती तस्करी, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, विना परवाना शस्त्र विक्री, जुगार अशा अवैध धंद्यांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येते. अनेक संसार उघड्यावर येवून तरूण पीढी व्यसनाधीन होते. समाजातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एएसपी श्रवण दत्त एस. यांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी एएसपी विशेष पथकाची स्थापना केली. मागील सहा महिन्यात त्यांच्या पथकाने कारवायांचा धडाका लावला आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांच्या उरात धडक भरली आहे. उपविभागात १५ पोलिस स्टेशन असून, पथकाने मागील सहा महिन्यात १०७ कारवाया केल्या असून त्यामध्ये खामगाव उपविभागात ५२ तर मलकापूर उपविभागात ५१ कारवायांचा समावेश आहे. या कारवाईच्या माध्यमातुन १ कोटी १६ लाख रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच २८२ हून अधिक जास्त आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या पथकात पोलिस उपनिरिक्षक पंकज सपकाळे, पोहेकॉ गजानन बोरसे, नापोका गजानन आहेर, रघुनाथ जाधव, संदीप टाकसाळ, राम धामोडे यांचा समावेश आहे.

कारवाईत अनेक बडे मासे लागले गळाला एएसपी पथकाने देशी कट्टा विक्री, जुगार व मटका, अवैध दारू विक्री, गुटखा, गांजा, अत्यावश्यक वस्तू प्रतिबंध, रेती तस्करी, वेश्या व्यवसाय, आयपीएल क्रिकेट सट्टा, मांजा यासह अनेक अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये ६९% कारवाया या जुगार, मटका प्रकरणाच्या असून १९ % कारवाया अवैध दारू विक्रीच्या आहेत. विशेष म्हणजे, यात अनेक बडे मासे गळाला लावून यांच्याविरुध्द थेट कारवाई करण्यात आली.

अवैध धंद्यांवर कायद्याचा वचक ^अवैध धंद्यांमुळे गावागावात शांतता भंग होते. तरूण पिढीवर वाईट परिणाम होतात. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांवर कायद्याचा वचक राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही पथकाच्या माध्यमातून कारवाया करीत आहोत. आपल्या परिसरात अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनीही त्याची माहिती पोलिसांना द्यावी, जेणेकरून अवैध धंदे रोखण्यास मदत होईल. श्रवण दत्त एस., अप्पर पोलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...