आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • Cheap Grain Distribution Vigilance Committee In Sangrampur Taluk Only On Paper; Committees Are Formed For Monitoring, But Simple Meetings Are Not Held Either| Marathi News

दुर्लक्ष:संग्रामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण दक्षता समित्या कागदावरच; देखरेखीसाठी समित्या स्थापन, परंतु साध्या बैठकही होत नाहीत

संग्रामपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेशन वितरण व्यवस्था सुरळीत व पारदर्शकरीत्या व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दक्षता समितीची स्थापनाच करण्यात आली नसल्याची माहिती आहे. तर बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये या समित्या केवळ नावालाच असून त्यांची साधी बैठकही होत नाही.

तालुक्यात ५१ ग्रामपंचायती आहेत. परंतु त्यापैकी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये अद्याप दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आली नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये या समित्या फक्त कागदावरच असल्याचे दिसत आहे. ग्रामस्तरावरील दक्षता समितीचे अध्यक्ष हे त्या गावचे सरपंच असतात. ग्रामपातळीवरील दक्षता समितीमध्ये शासकीय आणि अशासकीय मिळून एकूण तेरा सदस्य असतात. सर्व समित्यांवरील अशासकीय सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य या महिला असतात. शासन परिपत्रकानुसार सर्व स्तरावरील दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे आयोजित न केल्यास, सर्व स्तरावरील दक्षता समित्यांच्या सदस्य सचिवांविरुद्ध कर्तव्या बाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक), नियम, १९७९ चे उल्लंघन केल्याबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आहेत. शासन परिपत्रक १८ फेब्रुवारी २०१३ नुसार जिल्हा व तालुका स्तरावरील दक्षता समितीच्या बैठका प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनी घेण्यात याव्यात, अशा बैठकांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी त्याबाबत प्रसिद्धी देण्यात यावी, जनतेकडून पुरवठा विभागाच्या अनुषंगाने प्राप्त होणार्‍या तक्रारींवर या बैठकीत चर्चा करण्यात यावी. तसेच प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. अशा सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे.

शासनाच्या कल्याणकारी योजनेचा प्रमुख भाग म्हणजे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने आहेत. परंतु या दुकानातून होणार्‍या धान्य वितरणात अनेक त्रुटी आढळतात. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणाऱ्या धान्य वितरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते, त्यामुळे नागरिकांची फसगत होत असते. लाभार्थ्याची फसगत होवु नये व त्याला न्याय मिळावा, यासाठी ही समिती काम करते. परंतु बहुतांश ठिकाणी समित्याच स्थापन न झाल्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

तक्रार वही न देणे अदखलपात्र गुन्हा
कायदेशीर नियमावलीचे पालन गावातील दुकानात होत नसल्यास त्याबाबत दुकानातील तक्रार वहीत लेखी तक्रार नोंदवावी. दुकानात तक्रार वही ठेवलेली असते, ती मागुन त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता लिहून सही करावी. जर दुकानदाराने ही तक्रार वही दिली नाही. तर त्याबाबत तहसीलदारांकडे तक्रार करावी. तक्रार वही न देणे हा अदखलपात्र गुन्हा ठरतो. त्यामुळे तहसीलदार निश्चितपणे कारवाई करतात. तक्रार वहीत पाच तक्रारीची नोंद झाल्यानंतर दुकानदाराला दंड होतो. दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्रामपंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग नोंदवावा. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार होत असतील तर टाळे लावू शकते. मात्र याबाबत कोणत्याच गावातून अद्यापही तक्रारी आल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील दक्षता समित्या कागदावरच असल्याचे दिसून येते.

दर महिन्याला बैठक घेणे गरजेचे
तालुक्यातील ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच व तलाठी सचिव असतो. तर इतर सदस्य असतात. ग्राम दक्षता समितीने दर महिन्याला बैठक घेतली तर धान्याची अफरातफर होत नाही, प्रत्येक लाभार्थ्यांना सुरळीत धान्य मिळते, त्यासाठी ग्राम दक्षता समितीने दर महिन्याला बैठक घेणे गरजेचे आहे.
सिद्धेश्वर वरणगावकर, तहसीलदार

दक्षता समित्या फक्त कागदावरच
स्वस्त धान्य दुकानात देखरेख ठेवण्यासाठी ग्राम दक्षता समित्या तयार केल्या आहेत. परंतु तालुक्यातील ग्राम दक्षता समित्या फक्त कागदावरच असल्याचे दिसून येतात.
मोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...