आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ दिल्याचा दावा विमा कंपनीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेकांना अपेक्षेप्रमाणे रक्कम पदरात पडली नाही. तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कमच जमा झाली नाही. त्यामुळे विमा रकमेबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम कायम असल्याचे दिसते . यावर्षी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यामध्ये सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांनी ३० हजार २५८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते.
त्यानुसार विमा कंपनीने यावर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचा खाते क्रमांक दिला आहे, त्यांच्या खात्यात अगदी तुटपुंजी रक्कम जमा आहे. इतर बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना मात्र कोणतीही रक्कम मिळाली नाही. विम्यासाठी शेतकरी बँकेत फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांकडून सांिगतले जात आहे. त्यातच पीक विमा कंपनीही विमा वितरणाबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध करून देत नाही. या प्रकारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
प्रशासनाकडून दुर्लक्षित : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भात माहिती दिली जात नसल्याने शिवसंग्राम संघटना आक्रमक झाली होती. संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही विमा कंपनीवर कारवाई करण्यात आली नाही. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत रक्कम देणार असल्याचे सांिगतले होते. मात्र, रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य शासनाने दखल घेऊन मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आंदोलन करणार
पीक विमा वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवसंग्राम संघटनेने शेतकऱ्यांना तत्काळ विमा देण्याची मागणीही केली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करण्यात येईल. - राजेश इंगळे, तालुकाध्यक्ष, शिवसंग्राम संघटना, देऊळगावराजा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.