आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासृष्टी मंगलम प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून स्थानिक प्रजातीच्या वृक्ष बिजांचे संकलन व रोपण करण्यात येत आहे. सामाजिक तथा शासकीय स्तरावर जे वृक्षारोपण होत आहे. त्यामध्ये परदेशी वृक्षप्रजातीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतो. या झाडांवर पक्षी घरटे करत नाहीत व विसावा सुद्धा घेत नाहीत. पक्षी हे सृष्टीचे लागवड अधिकारी असून ते वृक्ष बीज दूरवर पोहोचवण्यात व लागवड करण्यात मोठी मदत करतात. त्यामुळे येथील कलाध्यापक संजय गुरव हे मागील अनेक वर्षांपासून देशी वृक्ष बीज संकलन व रोपण करत आहेत.
आजपर्यंत त्यांनी जवळपास केले असून हा उपक्रम स्वत: पुरताच मर्यादित न ठेवता त्यामध्ये विद्यार्थी, पालक, मित्र तथा नातेवाईक यांनाही सहभागी करून घेतले आहे हे विशेष. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, गुजरातमधील परिचितांना या उपक्रमात सहकार्यासाठी विनंती करतात. नोव्हेंबर महिन्यात या उपक्रमाला सुरूवात होते आणि उपक्रम जूनपर्यंत असतो.
त्यामध्ये प्रामुख्याने लिंब, बाभूळ, करंजी, बिबा, सिताफळ, अशोक, चिंच, आंबा, खैर, अंजन, वड, पिंपळ, रामकाठी, बेल, आवळा, कांचन, अर्जुन, मोह, हिरडा, हिवर, काटशीवर, महारूक, पळस, भिंगरी, हलदू, कवीठ, सिंधी, ताड, कर्ण जांभूळ, खिरनी, पिपरण, बोर यासह झुडपी वनस्पतीचे संकलन पत्नी मंगला गुरव यांचे सोबत ते करतात. या वृक्ष बीजाचे रोपण लगतच्या लेकुरवाडी टेकडी, रावण टेकडी, पाणदेव टेकडी, नंदा खोरा, सोनल बर्डी, हंड्या बरड टेकडीवर करण्यात येते.
जर आपल्या लगतच्या परिसरात देशी वृक्ष मोठ्या प्रमाणावर असल्यास जैवविविधता नांदेल व पुढच्या पिढीला या झाडांची ओळख राहील तसेच विविध प्रजातीचे पक्षी यावर अधिवास करतील त्याच प्रमाणे परागी करणाची मुख्य भुमिका बजावण्यात अग्रेसर असणाऱ्या मधमाश्यांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल. आपण फळ खाल्ल्यानंतर त्याची बीजे फेकून देतो. परंतु तसे न करता त्यांचे संकलन करून त्या बीजाचे आपल्या गावा लगतच टेकडीवरील झुडपात बीजारोपण करावे. बीजारोपण पावसाळ्याचे एक आठवड्या पूर्वी करावे. मानवी वस्तीत सुध्दा आपण देशी फळ झाडांचे रोपण करावे. जेणेकरुन अनेक प्रजातीचे पक्षी मानवाचा दृष्टीस पडुन पुढील पिढीला त्याची आवड निर्माण होईल. आजच सतर्क झालो नाहीतर पुढल्या पिढीला ह्या गोष्टीची आवडच निर्माण होणार नाही व ओळखही पटणार नाही.
उपद्रवी कीटकांच्या संख्येवर पक्षी नियंत्रण ठेवतात
मानवी वस्तीत तसेच शेताच्या बांधावर व वन परिक्षेत्रात जर देशी वृक्षांची संख्येत भर पडली तर नक्कीच पक्षी व परागीकरण करणार्या कीटकांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल. देशी वृक्षांवरच पक्षी घरटे करतात. जर आपल्या जवळपास देशी वृक्ष नसतील तर अनेक पक्षी दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळेच उपद्रवी कीटकांच्या संख्येत वाढ होते. पक्षी त्यावर नियंत्रण ठेवण्यात मदतनीस ठरतात. -संजय गुरव, वृक्ष व पक्षीमित्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.