आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलवाटालवी:मोताळा शहराला दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात ; ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

मोताळा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात मागील बऱ्याच वर्षांपासून बिघाड झाला आहे. त्यामुळे धरणातून येणाऱ्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली. ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नगर पंचायतमार्फत शहराला नळगंगा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु मागील काही वर्षांपासून येथील शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला आहे. त्यामुळे येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे धरणातून आलेल्या पाण्यावर शुद्धीकरण करण्याची कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता धरणातून आलेल्या पाण्याचा थेट शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाण्यात ब्लिचिंग पावडरचे प्रमाण कमी असून तुरटीचे प्रमाणही अत्यल्प आहे. आधीच जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यामुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. आता त्यावरही कळस म्हणजे पाण्यात तुरटीचा वापर बंद करणे म्हणजे एकप्रकारे आजाराला निमंत्रण देणे आहे. यापूर्वी शहराला लाल जंतुयुक्त पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांनी नगर पंचायत गाठून तक्रार केली होती. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना म्हणून जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई केली होती. तर आता मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवीन पाणीपुरवठा सभापतींसह नगर सेवकांनी दोन वेळा पाण्याच्या टाकीची साफसफाई केली आहे. परंतु येथील जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड असल्यामुळे पाण्याची टाकीची साफसफाई करून शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात झालेल्या बिघाडाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. परंतु येथील नगर पंचायत प्रशासन हे काम आमचे नसून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे असल्याचे सांगून वेळ मारून नेत आहे. यावरून नगर पंचायत प्रशासनाला येथील नागरिकांच्या आरोग्याविषयी कवडीचे घेणेदेणे नसल्याचे दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे शहरात रोगराई पसरली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत असून शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...